नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात आता नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने तपासाचा फास अधिक घट्ट केला आहे. एकीकडे या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार व सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनीसह (Nitin Upasani) अटक (Arrested) संशयितांची साेमवारी (दि. २८) नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी झाली, तर दुसरीकडे सन २०२५ मधील पहिल्या गुन्ह्याचा तपास करण्यासह दाेन्ही गुन्ह्यांची व्याप्ती पाहता नाशिक, नंदूरबार, धुळे व जळगाव येथे एकूण ४० पाेलीस अधिकाऱ्यांचे दहा पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
नाशिक विभागातील (Nashik Division) तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे उघडकीस आले असून, यातील सर्वाधिक ६३८ संशयित एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणात संशयित नितीन उपासनी, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, भाजप पदाधिकारी संजय गरूड, प्रशांत वाडीले, किरण पाटील, राहुल पवार, दीपक गरूड आणि तुषार साळुंके या आठ प्रमुख संशयितांना आतापर्यंत गजाआड करण्यात आले आहे.
गेल्या १० महिन्यांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेला मुख्य संशयित नितीन उपासनी याचा वैद्यकीय कारणास्तव दाखल जामीन अर्ज (Court) न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे. सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार जोशी यांच्यासमोर संशयितांना व्हीसीद्वारे हजर करण्यात आले. या प्रकरणी पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तर धुळ्यातून नाट्यमयरित्या जेरबंद करण्यात आलेला जळगावचा माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याच्या जामीन अर्जावर आता ८ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील पडद्यामागचे बडे धेंडे व सूत्रधार कोणाच्या आशीर्वादाने हे रॅकेट चालवत होते, याचा खरा बुरखा लवकरच फाटणार असल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तपासासाठी अधिकारी, अमलदार वाढविले
नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल पहिल्या गुन्ह्यात (गुन्हा क्रमांक. १६४/२०२५) तपास करण्यात आला. तेव्हा तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या निलंबनानंतर या गुन्ह्याचा तपास आता सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यात ११२ संशयित निष्पन्न झाल्यावर आता या गुन्ह्याचा तपास व्यापक पद्धतीने केला जाणार आहे. दुसऱ्या गुन्ह्याचा (गुन्हा क्रमांक २१६/२०२६) तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांसाठी १० विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.




