पंचवटी | Panchvati
निमाणी बस स्थानक आणि मार्केट यार्ड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय महिला टोळीला गजाआड करण्यात पंचवटी पोलिसांच्या (Panchvati Police) गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. अटक (Arrested) करण्यात आलेल्या दोन्ही महिला आरोपींकडून पोलिसांनी (Police) २ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याद्वारे पंचवटी पोलीस ठाण्यातील चोरी आणि घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदी करत असताना एका फिर्यादी महिलेला दोन संशयित महिलांनी धक्का दिला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरून पळ काढला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहायक निरीक्षक सतिश शिरसाठ व अंमलदारांनी मार्केट यार्ड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून दोन संशयित महिलांना ताब्यात घेतले.
आरोपी महिलांची नावे उषा किशोर सकटे (वय ५०, रा. देवास भोपाल चौराया, जुन्या झोपडपट्टी जवळ, ता. देवास, जि. इंदूर, मध्यप्रदेश) व पौर्णिमा किशोर सकटे (वय ३०, रा. सप्तश्रृंगी काली माता मंदिरजवळ, भोपाल चौराया, ता. देवास, जि. इंदूर, मध्यप्रदेश) अशी आहेत. पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील २ लाख ५० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि महावीर ज्वेलर्सचे नाव असलेली ३०० रुपयांची पर्स जप्त करण्यात आली. अधिक तपासात या महिलांनी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतीलच एका घरफोडीची कबुली दिली असून, त्यांच्याकडून घरफोडीतील ६ हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, निरीक्षक सुनील पवार (गुन्हे), नितीन आंधळे (प्रशासन) सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक सतिश शिरसाठ, अंमलदार अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, जयवंत लोणारे, चारोस्कर, जगताप, युवराज गायकवाड, वैभव परदेशी, सचिन बाहिकर, अमोल देशमुख, अंकुश काळे, नितीन पवार, आगोणे आणि महिला पोलीस अंमलदार रोहिणी भोईर यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कुलकर्णी करत आहेत.




