नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सोशल मीडियाचा (Social Media) वापर करून चोरीछुप्या पद्धतीने लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे अश्लिल व्हिडिओ (चाइल्ड पॉर्नोग्राफी) अपलोड, शेअर आणि डाऊनलोड करणाऱ्या विकृत मानसिकतेवर नाशिक शहर सायबर पोलिसांनी (Nashik Cyber Police Station) कारवाई केली आहे. राज्य सायबर सुरक्षा विभागाकडून प्राप्त झालेल्या गुप्त टिपलाइन डेटाच्या आधारे तब्बल २३ संशयित आयडीधारक, प्रोफाइलधारक आणि मोबाइलधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेटीझन्सना वाटणारे तथाकथित आभासी नाविन्य आणि सोशल मीडियाचे छुपेपण या कारवाईमुळे उघडे पडले आहे. फिर्यादीनुसार, ११ नोव्हेंबर २०२४ ते १३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शहरातील वेगवेगळ्या भागांतून इंटरनेटचा (वापर करून लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे पाेस्टस, व्हिडीओ व लिंक सोशल मीडियावर प्रसारित केले जात होते. राज्य सायबर सुरक्षा विभागाकडून प्राप्त झालेली माहिती मेटा इंटेलिजन्स सिस्टमशी जोडलेली होती. केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत ही माहिती राज्य सरकारकडे आणि त्यानंतर नाशिक शहर सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. सायबर पोलिसांनी या तांत्रिक डेटाचे विश्लेषण करून संशयितांचे (Suspected) अचूक लोकेशन ट्रेस केले आणि कारवाईचा बडगा उगारला.
टिपलाइन कसे करते काम?
मेटासारख्या सोशल मीडिया कंपन्यांच्या स्वयंचलित सिस्टममध्ये अल्पवयीन मुलांचे अश्लिल व्हिडिओ किंवा छायाचित्रे आढळल्यास ती सिस्टीम फ्लॅग होते. ही माहिती भारत सरकारच्या केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत राज्य सायबर सुरक्षा विभागाकडे पाठवली जाते. यी माहितीमध्ये संबंधित यूजरचा आयपी ॲड्रेस, सोशल मीडिया प्रोफाइल लिंक, मोबाइल नंबर आणि व्हिडिओ शेअर केल्याची अचूक वेळ असा भक्कम पुरावा असतो. टिपलाइन प्राप्त होताच स्थानिक सायबर पोलिस ठाणे संबंधित सिमकार्ड आणि इंटरनेट कनेक्शनच्या डिजिटल लोकेशनचा माग काढून कारवाई करते.
डाऊनलोड करणे किंवा पाहणेसुद्धा गुन्हा!
अल्पवयीन मुलामुलींचे अश्लिल छायाचित्रे किंवा व्हिडिओ कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहणे, डाऊनलोड करणे, सेव्ह करणे किंवा पुढे फॉरवर्ड करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आणि पाेक्सो कायद्यांतर्गत गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे. केवळ व्हिडिओ शेअर करणाराच नाही, तर तो डिजिटल स्वरूपात साठवून ठेवणारा युजरही कायद्याच्या कचाट्यात येताे.




