नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तत्परता आणि सुजाण नागरिकांच्या अचूक माहितीच्या बळावर हरसूल पोलिसांनी (Harsul Police) कश्यपी धरण (Kashypi Dam) परिसरातून पळ काढणाऱ्या आंतरराज्य दारू तस्करांचा तब्बल ४० ते ५० किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या आहेत. जंगलाचा आणि घाटाचा रस्ता असूनही केवळ नागरिकांनी दिलेल्या वेळोवेळच्या ‘लाईव्ह अपडेट्स’मुळे पोलिसांना तस्करांचे अचूक लोकेशन ट्रेस करता आले. या कारवाईत पोलिसांनी २३ लाख ४८ हजार ५४० रुपयांच्या मुद्देमालासह दोन अलिशान गाड्या जप्त केल्या असून, गुजरातच्या (Gujrat) एका चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी जिल्ह्यातील अवैध दारू तस्करी मोडीत काढण्यासाठी नाकाबंदीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, १८ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) कश्यपी धरण परिसरातील खाडेचीवाडी येथे हरसूल पोलिसांनी सापळा रचला होता. नाकाबंदीवर तैनात अंमलदार अनिल गांगुर्डे यांना दोन संशयित वाहने (क्रेटा आणि महिंद्रा) भरधाव वेगात येताना दिसली. मात्र, पोलीस पाहताच तस्करांनी गाड्या थेट ‘यू-टर्न’ मारून वाघेरा गावाच्या दिशेने पळवल्या. गांगुर्डे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना याची कल्पना दिली. दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क आणि रस्त्यांचा अंदाज घेणे कठीण असताना, रस्त्यावरील गावातील नागरिकांनी पोलिसांना (Police) मदत केली. गाड्या कोणत्या दिशेने जात आहेत, याची अचूक माहिती नागरिकांनी पोलिसांना फोनद्वारे वेळोवेळी दिली.
गटारातून काढली गाडी
नागरिकांच्या माहितीच्या आधारे जीवन बोरसे व त्यांच्या पथकाने शासकीय वाहनाची वाट न पाहता खाजगी वाहनाने थेट वाघेरा घाटाचा पायथा गाठला. नाकेपाडा येथील वनविभागाच्या चेकपोस्टसमोर पोलीस आणि तस्करांच्या गाड्या समोरासमोर आल्या. पोलिसांनी प्रसंगावधान राखून क्रेटा गाडीसमोर (GJ-05-RN-5744) आपले वाहन आडवे लावले आणि चालकाला जागेवरच थांबविले. मात्र, पोलिसांना चकवा देण्यासाठी मागून येणाऱ्या महिंद्रा गाडीच्या चालकाने थेट रस्त्याच्या बाजूच्या गटारातून गाडी काढली आणि हरसूलच्या दिशेने वेगाने पळ काढला.
४० किमीचा थरारक पाठलाग
गटारातून गाडी काढून पळणाऱ्या महिंद्रा चालकाचा पोलिसांनी पाठलाग सोडला नाही. पालीफाटा, हरसूल, दलपतपूर, तोरंगण ते थेट वाहनदरीपर्यंत दुर्गम घाट आणि जंगलाच्या रस्त्यांवरून पोलिसांनी तब्बल ४० किलोमीटरचा पाठलाग केला. अखेर वाहनदरी येथे पोलिसांनी या गाडीला घेराव घालून ती पकडली.
मुद्दे तपशील
एकूण जप्त मुद्देमाल : २३ लाख ४८ हजार ५४०
जप्त वाहने : क्रेटा आणि महिंद्रा
अटक संशयित : रामनिवास पुनमराम बिश्नोई (वय- वर्षे, रा. सुरत, गुजरात)
पसार संशयित : महिंद्रा गाडीचा चालक
कारवाईचे ठिकाण : कश्यपी धरण ते वाहनदरी, त्र्यंबकेश्वर-हरसूल
तपास : हवालदार हेमराज गवळी




