Friday, October 2, 2026
Homeक्राईमNashik Crime News : फिटनेस सेंटरच्या आड देहविक्री; मुंबईनाक्याजवळील बंगल्यावर छापा, परप्रांतीय...

Nashik Crime News : फिटनेस सेंटरच्या आड देहविक्री; मुंबईनाक्याजवळील बंगल्यावर छापा, परप्रांतीय दलाल पसार

​नाशिक । प्रतिनिधी | Nashik

भरवस्तीतील एका बंगल्यावर ‘पर्सनल फिटनेस सेंटर’चा फलक (बोर्ड) लावून त्याआडून गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्याचा नाशिक शहर पोलिसांच्या (Nashik City Police) मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या (पीसीबी एमओबी) पथकाने शुक्रवारी (दि. १९) पर्दाफाश केला आहे. मुंबई नाका परिसरातील (Mumbai Naka Area) माधव नगरातील ‘शिवम’ बंगल्यावर टाकलेल्या या धाडीत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. प्रतिग्राहक तब्बल ४ हजार रुपये उकळून हा अनैतिक व्यवसाय चालविला जात असल्याचे समोर आले आहे. ​याप्रकरणी पोलिसांनी अड्डा चालवणारा मुख्य संशयित संजय शर्मा याच्यासह व्यवस्थापक कृष्णाकुमार यादव यांच्यावर ‘पिटा’अंतर्गत गुन्हा दाखल केला असून यादव याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

​मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाका येथील माधव नगरातील ‘शिवम’ बंगल्यात फिटनेस सेंटरच्या नावाखाली परप्रांतीय व काही महिलांकडून (Woman) देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. गेल्या सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. या माहितीची खातरजमा करण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने एक ‘बनावट ग्राहक’ या बंगल्यावर पाठवला.

तेथे प्रतिग्राहक चार हजार रुपयांत सौदा ठरल्याचे आणि आतमध्ये देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची खात्री पटताच, पंच आणि एनजीओ प्रतिनिधींच्या उपस्थितीत पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. भरवस्तीत हा प्रकार चालत असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई (Action) केली.

​मुख्य सूत्रधार पसार, मॅनेजर गजाआड

या अड्ड्याचा मुख्य सूत्रधार संशयित संजय विजय शर्मा (रा. अशोका मार्ग, नाशिक) हा कारवाईपूर्वीच घटनास्थळावरून पसार झाला. तर तेथील व्यवस्थापन सांभाळणारा त्याचा साथीदार कृष्णाकुमार सिताराम यादव (वय २६, रा. माधवनगर, मुंबईनाका, मूळ रा. पथरा गाव, ता. जि. हजारीबाग, झारखंड) हा पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी तेथून एका पीडित महिलेची सुटका केली असून, संशयित यादव याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

​’पिटा’ अन् गुन्ह्याची नोंद

​या प्रकरणी संशयित संजय शर्मा आणि कृष्णाकुमार यादव या दोघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (पिटा) १९५६ चे कलम ३, ४ व ५ अन्वये मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार शर्माचा शोध पोलीस घेत आहेत. तपास मुंबई नाका पोलीस ठाणे करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....