लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon
बाजारात कांद्याच्या (Onion) दराने उसळी घेतली असतानाच, आता कांदा चोरट्यांच्या निशाण्यावर आला आहे. कळवण (Kalwan) येथील एका व्यापाऱ्याचा १२ ते १३ लाख रुपये किमतीचा ३० टन कांद्याने भरलेला ट्रक समृद्धी महामार्गावरून (Samruddhhi Highway) पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, जालना आणि वाशिम पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीने केलेल्या नाकाबंदीमुळे अवघ्या काही तासांतच या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
नेमकी घटना काय?
सध्या मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाल्याने कांद्याचे दर वधारले आहेत. होलसेल बाजारात कांदा ४० रुपयांच्या आसपास, तर किरकोळ बाजारात ६० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. याच वाढत्या दराचा फायदा घेत चोरट्यांनी महामार्गावर कांद्याचे ट्रक लुटण्याचा कट रचला. कळवणचे कांदा व्यापारी दादाभाऊ ठुबे यांचा ३० टन कांदा भरलेला ट्रक समृद्धी महामार्गावरून झारखंड राज्याकडे जात होता. हा ट्रक जालना जिल्ह्यातील डोणगाव परिसरात आला असताना, ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावलेल्या एका स्कोडा कारमधून ४ ते ५ अज्ञात संशयित आले. त्यांनी फिल्मी स्टाईलने ट्रक अडवला आणि ट्रक चालकाला बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत चालक रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला. यानंतर चोरट्यांनी कांद्याने भरलेला तो ट्रक पळवून नेला.
पोलिसांची तत्परता आणि थरारक कारवाई
चालक जखमी अवस्थेत असतानाही त्याने प्रसंगावधान राखत तत्काळ पोलिसांच्या (Police) ‘११२’ या आपत्कालीन मदत क्रमांकावर संपर्क साधला आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून जालना पोलिसांनी तातडीने वाशिम पोलिसांशी संपर्क साधला आणि महामार्गावर कडेकोट नाकाबंदी केली. पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत कांद्याने भरलेला ट्रक आणि गुन्ह्यात वापरलेली स्कोडा कार पकडण्यात आली. तसेच कारमधील संशयित आरोपींनाही पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.
नाशिकमध्ये व्यापाऱ्यांत खळबळ
या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले संशयित हे नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) चांदवड व निफाड, तसेच काही जण कलकत्ता येथील असल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. कांद्याला मिळत असलेले चांगले दर आणि अशा प्रकारे महामार्गावर मोठ्या प्रमाणातील मालाची लूट झाल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कांदा वाहतूकदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास जालना पोलीस करत आहेत.




