पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result) शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा केला जात असताना, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हसरूळ परिसरातील (Mhasrul Area) निसर्ग नगर येथे नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते (Gokul Gite) यांच्या विजयी मिरवणुकीत गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने दोन जणांच्या गळ्यातील तब्बल ६ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चैन लांबवल्या आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस (Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम अशोक पाटील (वय ३०, रा. मु.पो. नगरसूल, ता. येवला, जि. नाशिक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गिते हे विजयी झाल्याने त्यांच्या स्वागतासाठी आणि विजयोत्सवासाठी म्हसरूळ येथील निसर्ग नगर भागातील त्यांच्या बंगल्याजवळ समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. सोमवार, दि. २२ जून रोजी दुपारी २:०० वाजताच्या सुमारास ही विजयी मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीच्या जल्लोषात फिर्यादी शुभम पाटील आणि त्यांचे मित्र साक्षीदार मनोज उत्तमराव दिघे हे दोघेही सामील झाले होते.
कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि ढोल-ताशांच्या गजरात अचानक झालेल्या ढकलाढकलीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दोघांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्यांवर डल्ला मारला. शुभम पाटील यांची १५०,००० रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन. तर मनोज दिघे यांची ५४५,००० रुपये किमतीची ३३ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरीला गेली. काही वेळानंतर गळ्यातील चैन चोरीला गेल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी तातडीने म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी (Police) अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस हवालदार जगताप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. विजयोत्सवाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे काम सुरू आहे.




