नाशिक | प्रतिनिधी | Nashik
खासगी सावकार सद्दाम बाबू शेख आणि त्याच्या गँगची नाशिक शहरातील (Nashik City) दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी (Police) कंबर कसली असतानाच, त्याच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. एका फ्लॅट ब्रोकरला जिवे मारण्याची धमकी देऊन, चाकूचा धाक दाखवत तब्बल दाेन लाख २० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आणि बीएमडब्ल्यू गाडीतून अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सद्दाम शेखसह त्याच्या दोन अनोळखी साथीदारांवर आणि मामु नावाच्या संशयितावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गणेश महेश झाल्टे (वय ३९, रा. अमृतधाम, पंचवटी) यांनी या फिर्याद दिली आहे. झाल्टे हे फ्लॅट खरेदी-विक्रीची ब्रोकरशिप आणि ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून काम करतात. फिर्यादीनुसार, सद्दाम शेख याने सप्टेंबर २०२४ मध्ये झाल्टे यांना हनुमान नगर येथील त्याच्या ऑफिसमध्ये (Office) बोलावून त्याच्या इमारतीतील फ्लॅट विक्री करून देण्यास सांगितले होते. मात्र, सद्दामच्या दहशतीमुळे झाल्टे यांनी त्यात रस दाखवला नाही. याचा राग धरून सद्दाम आणि त्याच्या साथीदारांनी ट्रॅक्टर हाऊस परिसरात झाल्टे यांची गाडी अडवली.आमच्या गँगला महिना २० हजार रुपये हप्ता दिला नाही तर ब्रोकरशिप करू देणार नाही, अशी धमकी देत चाकूचा धाक दाखवून त्यांना दोन तास ताटकळत ठेवले.
देशदूतच्या व्हाट्सॲप चॅनेलला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
याच घटनेदरम्यान सद्दामने ‘मामु’ नावाच्या व्यक्तीला बोलावून २२ डिसेंबर २००३ चे एक जुने साठेखत मागवून घेतले. त्या कागदपत्रावर (Document) साक्षीदार म्हणून सही करण्यास झाल्टे यांनी नकार दिला असता, त्यांच्या मानेला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. भीतीपोटी झाल्टे यांनी स्वतःसह वडिलांच्या नावाने त्यावर जबरदस्तीने स्वाक्षरी केली. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ ते जून २०२६ या काळात झाल्टे यांच्याकडून वेळोवेळी १ लाख २० हजार रुपयांची हप्ता-खंडणी उकळण्यात आली.
बीएमडब्ल्यूतून अपहरण
झाल्टे यांनी हप्ता देणे बंद केल्यानंतर ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात खडकाळी सिग्नल परिसरात ते दुचाकीचे काम करत असताना, सद्दाम शेख त्याच्या साथीदारासह बीएमडब्ल्यू गाडीतून आला. त्याने झाल्टे यांना जबरदस्तीने गाडीत बसवून पोटाला चाकू लावला आणि तुझा गेमच करतो अशी धमकी देत १ लाख रुपयांची मागणी केली. झाल्टे यांनी नातेवाईक व मित्रांकडून तातडीने पैसे मागवून सद्दामला दिले.
पोलीस कारवाईमुळे तक्रारदारास धीर
सद्दाम शेख आणि त्याच्या गँगच्या दहशतीमुळे फिर्यादी आतापर्यंत गप्प होते. मात्र, नुकतीच नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) सद्दामवर कारवाई केल्याचे समजताच झाल्टे यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहेे.




