नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सत्य घटना, निसर्ग आणि माणसांचे हावभाव कॅमेऱ्यात टिपणाऱ्या एका छायाचित्रकारानेच (फोटोग्राफर) स्वतःच्या राजकीय ओळखीचा वापर करून तब्बल तीन कोटींचा ‘फेक ड्रामा’ रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील (Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbhmela) पोलीस बंदोबस्त, राहण्याची सोय आणि कामांच्या बनावट ‘वर्क ऑर्डर’ तयार करून कंत्राटदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील ५१ वर्षीय छायाचित्रकार नरेंद्र तोताराम महाजन याला पोलिसांनी गजाआड केले आहे.
छायाचित्रणाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक वर्तुळात वावर असलेल्या नरेंद्र महाजन (Narendra Mahajan) याने या ओळखींचा गैरफायदा घेत ‘ईझी मनी’ (सोप्या मार्गाने पैसा) कमावण्याची नवीच ‘क्लिक’ शोधून काढली. त्याचा मित्र तनय अनंत महाजन (३२, रा. पाचाेरा राेड, जामनेर) याच्याशी हातमिळवणी करून त्यांनी सिंहस्थातील कंत्राटांचे आमीष कंत्राटदारांना दाखवले. यासाठी महाराष्ट्र शासन, राजमुद्रा आणि ‘नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा ऑथोरिटी सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग’ या नावाने थेट विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी असलेले बनावट टेंडर पेपर्स व ‘वर्क ऑर्डर’ तयार करण्यात आले. कॅमेऱ्याच्या मागे राहून बारकावे टिपण्याच्या आपल्या कौशल्याचा वापर नरेंद्रने या गुन्ह्यासाठी केल्याचे दिसून येत आहे; कारण बनावट शासकीय कागदपत्रे आणि टेंडर नोटीस इतक्या हुबेहूब तयार करण्यात आल्या होत्या की, कंत्राटदारांचा त्यावर सहज विश्वास बसला.
त्यानंतर संशयितांनी पैसे उकळले. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जामनेर येथील पत्रकार परिषदेत या प्रकरणी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सूत्रे हलवत संशयित छायाचित्रकार नरेंद्र महाजन आणि त्याचा साथीदार तनय महाजन या दोघांना जामनेरमधून निष्पन्न करून अटक केली. शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पाेलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व संदीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई (Action) केली. या प्रकरणात शकील अहमद सलीमुद्दीन शेख याच्यासह इतर संशयितांचा शोध सुरु असून, एका फोटोग्राफरने रचलेला हा फसवणुकीचा ‘अँगल’ सध्या नाशिकसह जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरताे आहे.
१ हजार ३११ कोटींची ‘हवा’
संशयितांनी कंत्राटदारांना एकूण १ हजार ३११ कोटी २८ लाख रुपयांची कामे मिळवून देण्याचे आमीष दाखवले होते. या बदल्यात त्यांनी तीन वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ३ कोटी ५ लाख रुपये उकळले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिंहस्थ कंत्राटाच्या बनावट ‘वर्क ऑर्डर’ प्रकरणी आतापर्यंत नाशिकमध्ये पाच गुन्हे नोंद आहेत.
मुद्दे
-सिंहस्थात ७० दिवसांसाठी पोलीस, एसआरपीएफ आणि होमगार्डच्या जेवणासाठी २६८ कोटींच्या कंत्राटाचे आमीष दाखवून १ कोटी ४० लाख रुपये उकळले.
-कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या, गाद्या-बादल्यांच्या ४५२ कोटी २८ लाखांच्या कंत्राटापोटी ५० लाख रुपये घेतले.
-५९१ कोटींच्या सोलर पॉवर व इन्व्हर्टर बसवण्याच्या कंत्राटापोटी १ कोटी १५ लाख रुपये घेत फसवणूक केली.
-एकत्रित कंत्राट रक्कम – १ हजार ३११ कोटी २८ लाख
संशयितांनी घेतलेली रक्कम – ३ कोटी ५ लाख
असे गुन्हे नोंद
गुन्हा क्रमांक ४८१/२०२६
कंत्राट – पाेलीस, होमगार्डचे जेवण आणि पाण्याचा पुरवठा
रक्कम – २६८ कोटी (तीन ऑर्डर मिळून)
घेतलेली रक्कम – १ कोटी ४० लाख
गुन्हा क्रमांक ४८२/२०२६
कंत्राट – पोलिसांसाठी हाऊसकीपिंग, पांघरूण व्यवस्था
रक्कम – ४५२ कोटी २८ लाख
घेतलेली रक्कम – ५० लाख
गुन्हा क्रमांक ४८३/२०२६
कंत्राट – सोलर पॉवर प्लांट, बॅटरी आणि इन्व्हर्टर बसवणे
रक्कम – ५९१ कोटी
घेतलेली रक्कम – १ कोटी १५ लाख




