Sunday, August 2, 2026
Homeक्राईमNashik Crime News : युरियाचा काळाबाजार; माजी जिल्हा परिषद सदस्यासह दोघांना अटक

Nashik Crime News : युरियाचा काळाबाजार; माजी जिल्हा परिषद सदस्यासह दोघांना अटक

७२८ युरिया गोण्यांसह ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

लासलगाव | वार्ताहर | Laslgaon

एकीकडे शेतकरी (Farmer) युरिया खताच्या टंचाईचा सामना करत असताना, दुसरीकडे शेतीसाठीच्या अनुदानित युरियाचा (Urea) गैरवापर करून काळाबाजार करणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसांनी (Lasalgaon Police) पर्दाफाश केला आहे. विंचूरजवळील विष्णुनगर येथे टाकलेल्या छाप्यात (Raid) पोलिसांनी ७२८ गोण्या युरिया आणि दोन वाहनांसह एकूण ८८ लाख ३६ हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका माजी जिल्हा परिषद सदस्यासह दोघांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

- Advertisement -

गुप्त माहितीवरून टाकण्यात आला छापा

विंचूर परिसरातील विष्णुनगर भागात कांदा (Onion) खळ्याच्या आडोशाने अनुदानित युरिया खताची बेकायदेशीर विक्री आणि काळाबाजार होणार असल्याची गुप्त माहिती लासलगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते व त्यांच्या पथकाने क्रांती हॉटेलच्या पाठीमागील भागात अचानक छापा टाकला. या छाप्यादरम्यान लातूरवरून ‘आयशर’ वाहनाने (एम २३ एयु ५१९३ ) आणलेला अनुदानित युरिया व्यावसायिक फायद्यासाठी दुसऱ्या मोठ्या ट्रकमध्ये (एमएच ५७ बी ६७७७) पलटी केला जात असल्याचे रंगेहात निदर्शनास आले.

दोघांवर गुन्हा दाखल, वाहनांसह माल जप्त

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी (Police) तात्काळ कृषी विभागाच्या पथकाला पाचारण केले. चौकशीअंती काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाल्यावर कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात ‘अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५’ आणि ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर दगू पवार (वय ३७, रा. इंदिरा नगर, विंचूर) आणि सागर किशोर गरड (वय २७, रा. सुभाष नगर रोड, विंचूर) यांना अटक करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई

शासनाकडून शेतकऱ्यांना अल्पदरात अनुदानित युरिया दिला जातो. मात्र, काही व्यावसायिक हा युरिया चढ्या दराने विकून शासनाची आणि शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम., आणि निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सपोनि सागर कोते, पोउपनि किरण साळुंके व पोलीस अंमलदारांसह जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जितेंद्र पगार आणि निफाड पंचायत समितीचे कृषी अधिकारी संदीप मोगल यांचा समावेश होता.

ताज्या बातम्या

ट्रकच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

0
नांदगाव | प्रतिनिधी Nandgaon भरधाव वेगात जाणार्‍या ट्रकखाली सापडून २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ही दुर्दैवी घटना...