नाशिक | Nashik
नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या (Nashik Road and Upnagar Police Station Area) हद्दीत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून अटक (Arrested) केली. संशयितांकडून एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली १० लाख रुपये किमतीची स्कोडा (एमएच ३९ जे ३१४७) कार जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी (२५, रा. त्रिमूर्ती चौक, व्ही-मार्टसमोर, नवीन नाशिक) आणि आकाश दीपक गायकवाड (२५, रा. लक्ष्मीनगर, शिर्डी नगर रोड, आहिल्यानगर) अशी आहेत.
२९ जुलै रोजी रात्री नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ स्वप्नील गोसावी व साथीदारांनी फिर्यादीला पिस्तूलाचा धाक दाखवून १७ हजार रुपये हिसकावून नेल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ३० जुलै रोजी मध्यरात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाधव मळा येथे आरोपींनी एका इमारतीच्या पार्किंगमध्ये जाऊन मर्सिडीज कारची तोडफ रोड केली. विरोध करण्यासाठी आलेल्या फिर्यादीवर स्वप्नील गोसावीने गावठी कट्ट्यातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली गुंडा विरोधी पथक, नाशिकरोड गुन्हे शाखा युनिट आणि नाशिकरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक अशी तीन संयुक्त पथके तयार करण्यात आली.
संशयितांचा (Suspected) शोध घेताना पोलिसांनी (Police) अहिल्यानगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, संगमनेर, राजूर, अकोले, लोणी आणि कोल्हार परिसरात गुप्त तपास केला. कोल्हार येथून आरोपी राहुरी साखर कारखान्याकडे स्कोडा कारने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून भरधाव कार अडवली आणि दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीत संशयितांकडून १ लाख रुपये किमतीचा गावठी कट्टा, ४ हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे आणि १० लाख रुपये किमतीची स्कोडा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि संदीप पवार, पोहेका विजयकुमार सूर्यवंशी, सुनील आडके, अविनाश देवरे, प्रदीप ठाकरे, राहुल जगझाप, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, राकेश राऊत, संदीप भुरे, गुरु गांगुर्डे, सुनिता कवडे, गुन्हे शाखेचे सुशांत दिघे, केतन सोनवणे तसेच नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील विशाल कुवर, समाधान वाजे आणि अजय देशमुख यांनी संयुक्तपणे यशस्वीरीत्या पार पाडली.




