अंबासन | वार्ताहर | Ambasan
नामपूर (Nampur) येथील एका खाजगी कोचिंग क्लासच्या श्री मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा (Student) मोसम नदीच्या बंधाऱ्यात बुडून मृत्यू (Death) झाला. अथर्व दीपक पगार (रा. उतराणे) आणि प्रसाद दादाजी वाघ (रा. नामपूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
अशोक पाटील यांच्या खाजगी कोचिंग क्लासमध्ये (Coaching Class) बसवलेल्या गणपतीचे पाचव्या दिवशी आरतीनंतर मोसम नदीत विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर इतर विद्यार्थी परतले, मात्र अथर्व आणि प्रसाद यांना पोहण्याचा मोह झाल्याने ते बंधाऱ्याजवळ थांबले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरेन अहिरे या तिसऱ्या मित्राला स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखून रोखल्यामुळे त्याचा जीव वाचला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी (Youth) बंधाऱ्यात उतरून दोघांना बाहेर काढले आणि तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदयद्रावक होता. वर्ग संचालकांच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी कोचिंग क्लास संचालक अशोक पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.




