Tuesday, January 20, 2026
Homeक्राईमNashik Crime : अमानवी कृत्य! शिक्षकाचा नऊ वर्षीय विद्यार्थीनीवर सात ते आठ...

Nashik Crime : अमानवी कृत्य! शिक्षकाचा नऊ वर्षीय विद्यार्थीनीवर सात ते आठ महिने लैगिंक अत्याचार

घोटी | वार्ताहर | Ghoti

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) घोटी पोलीस ठाण्याच्या (Ghoti Police Station) हद्दीत येणार्‍या करंजवाडी (अडसरे बु) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीला (Girl Student) चॉकलेटचे आमिष दाखवून शिक्षकाने तब्बल सात ते आठ महिने लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी एका महिलेने घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिच्या फिर्यादीनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (ZP School) करंजवाडी येथे कार्यरत शिक्षक रामचंद्र मनाजी कचरे (वय ५५) याने संबंधित विद्यार्थिनीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिला चॉकलेटचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून, हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील सदर विद्यार्थिनीला देण्यात आली होती, असे फिर्यादीत सांगण्यात आले आहे.

YouTube video player

शुक्रवार (दि.१६) रोजी हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून, पालकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे. शाळेसारख्या पवित्र शिक्षण मंदिरातच असे अमानवी कृत्य घडल्याने शिक्षण व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी ग्रामस्थ व पालकांनी संशयित आरोपी असलेल्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही इगतपुरी तालुक्यातील टाकेद परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एका मुख्याध्यापकाने अशाच प्रकारचे निंदनीय कृत्य केले होते. ते प्रकरणाची जखम अजून ताजी असतानाच आता पुन्हा एका लहान मुलीवर शाळेतच अत्याचार झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

फिर्यादीच्या माहितीनुसार, संशयित आरोपी शिक्षक रामचंद्र कचरे यांनी यापूर्वीही अनेक वेळा अशाच प्रकारची कृत्ये केल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलीसांकडून (Police) अधिक सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम बोलावून शास्त्रीय पद्धतीने तपास करण्यात आला आहे. पुरावे संकलन, वैद्यकीय तपासणी व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. देवरे, गुरुदेव मोरे व पोलीस हवालदार तुषार ढगे तपास कामकाज पाहत आहेत. तर संशयित आरोपी असलेल्या शिक्षकाविरूद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा (Case) दाखल करण्यात आला असून, त्याला अटक (Arrested) करण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : नेत्यांच्या वर्चस्वसंघर्षाचा शिवसेनेला फटका

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता आकडेमोड सुरू झाली असून, प्रत्येक जण लाभ-हानीच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न...