नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच मालकाच्या साम्राज्यावर डल्ला मारला. नाशिकच्या (Nashik) एका वयोवृद्ध मद्य व्यावसायिकाच्या भाबडेपणाचा फायदा घेत, इंग्रजी भाषेच्या अज्ञानाचा अडसर करून तब्बल ७५ टक्के भागीदारी लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगल ब्रैडी हाऊसच्या मालकी हक्कावरून खेळला गेलेला हा खेळ एका लिकरमाफियाने सरकारी यंत्रणेला हाताशी धरून रचलेलं षडयंत्र असल्याचा संशय आहे. याप्रकरणी संशयित अतुल विजय मदन याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल झाला असून, नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा ताबा घेतल्याने लिकर लॉबीचे धाबे दणाणले आहे.
फिर्यादी दीपक श्रीधर पाटील (६८, रा. येवला, जि. नाशिक) यांचे पंचवटीतील आडगाव नाका येथे मंगल ब्रँडी हाऊस नावाचे वाईन शॉप (Wine Shop) आहे. ते वयोवृद्ध आणि शारीरिक व्याधी असल्याने त्यांनी मद्यविक्री व्यवसायातील परिचित संशयित अतुल मदन याला व्यवसायाचे व्यवस्थापन सोपवले होते. मात्र, मदनने गैरफायदा घेत कारस्थान रचले. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी त्याने पाटील यांना इंग्रजी भाषेत तयार केलेल्या कागदपत्रांवर सह्या करण्यास सांगितले.
पाटील यांना इंग्रजी येत नसल्याने आणि मदनवर विश्वास असल्याने त्यांनी व्यवस्थापन करारनामा समजून स्वाक्षरी केली. प्रत्यक्षात मदन याने तो भागीदारी करारनामा तयार केला होता, ज्याद्वारे त्याने व्यवसायात ७५ टक्के हिस्सा स्वतःच्या नावे करून घेतला. त्याने पाटील यांच्या पत्नी आणि दोन मुलांच्या संमतीशिवाय कोऱ्या बाँडवर त्यांच्या सह्या घेतल्या आणि त्यांचे खोटे संमतीपत्र नोटराईज करून राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात सादर केले. चलन भरतानाही त्याने स्वतःचा पॅन नंबर वापरून मूळ मालक असल्याचे भासवले.
उत्पादन शुल्कचे गौडबंगाल?
कायद्यानुसार, वाईन शॉपच्या भागीदारीत बदल करताना मूळ परवानाधारकाची प्रत्यक्ष उपस्थिती, ओळख पटवणे, चौकशी अनिवार्य असते. मात्र, मदनने बनावट संमतीपत्रे, कुटुंबाच्या खोट्या सह्या आणि कोऱ्या बाँडचा वापर याकडे उत्पादन शुल्क विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले का ? मूळ मालकाच्या अनुपस्थितीत संशयित व्यक्तीने सादर केलेल्या अर्जावरून ७५ टक्के भागीदारी कशी मंजूर झाली? हा केवळ एकट्या मदनचा प्रताप आहे की त्याला विभागातील काही अधिकाऱ्यांचे अभय आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल तपास करत आहेत.
पोलीस आयुक्तांकडे कैफियत
पाटील पिता-पुत्राने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन सदर प्रकाराची माहिती दिली. आयुक्तांनी आदेश देताच गुन्हे शाखेने फिर्याद नोंदवून तपासास सुरुवात केली. मदन हा केवळ या प्रकरणापुरता मर्यादित नसून, त्याचे नाशिकमधील मद्यविक्री क्षेत्रातील इतर कनेक्शन्स तपासले जात आहेत. लिकरमाफियांच्या या जाळ्यात अजून किती व्यावसायिक अडकले आहेत? आणि सरकारी कार्यालयातील कोणते एजंट याला खतपाणी घालत आहेत याचा तपास करून गुन्हे शाखा नवे रॅकेट उघड करण्याची शक्यता आहे.
मुद्दे
- मदन बनावट सह्यांचा मास्टरमाईंड
- चलन भरताना आपलाच पॅन नंबर वापरून यंत्रणा हायजॅक
- मदनच्या दादागिरीमुळे माहिती अधिकाराचे हत्यार उपसले
- मदनच्या एकूणच व्यवसायाची सखोल तपासणी





