नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मद्यपि तरुणाने ‘हॅप्पी होळी’ म्हणत थेट सुलभच्या कामगारास पेटवून दिल्याची खळबळजनक घटना ठक्कर बाजार बसस्थानकात शुक्रवारी रात्री घडली. बस स्थानकाच्या स्वच्छतागृहातील विजय गहलोत (वय ५४, रा. देवळाली कॅम्प) हे साठ टक्के भाजले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Hospital) उपचार सुरू आहेत. तर गेहलोत यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा संशयित शुभम सतीश जगताप (२२, रा. खाकी आखाडा, नाकचौक, पंचवटी) याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने काही तासांत अटक (Arrested) करुन गजाआड केले आहे.
शुक्रवारी रात्री ८ वाजता गहलाेत हे स्वच्छतागृहाच्या प्रवेशद्वारावर असताना तिथे शुभम आला. त्याला गेहलोत यांनी हटकले व ‘तू येथे परत येऊ नको, तुझ्यामुळे आमची बदनामी होते, परत आला तर बघ’ असे म्हटले. त्यामुळे संतापलेल्या शुभम जगतापने काढता पाय घेतला. तसेच काही वेळातच परत येत, प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले पेट्राेल गेहलोत यांना ‘हॅप्पी होली’ म्हणत अंगावर ओतले. तसेच सिगारेटच्या लाइटरने त्यांना पेटवून दिले. यावेळी दुसऱ्या कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांच्या मदतीने गहलोत यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, यावेळी पोलिसांनी (Police) गेहलाेत यांंना घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोलिसांना त्यांच्याशी बोलता आले नाही. संशयिताला कोणीही नातलग नसल्याने तो ठक्कर बाजार परिसरातील एका खोलीजवळ रात्री मुक्काम करायचा. दिवसभर परिसरातील हॉटेलात किंवा इतरत्र किरकोळ कामे करुन त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. संशयिताचे व गेहलोत याचे कोणत्यातरी कारणातून कायम वाद व्हायचे. त्या रागातून ही घटना घडली.
त्याने दिली कबुली
दरम्यान, निशा विजय गहलोत यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने शुभमला रात्री दाेन वाजता इदगाह मैदान येथून ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, ‘मी सुलभ शौचालयाच्या बाजुला असणाऱ्या मीटर बॉक्सच्या रूममध्ये राहत होतो. तेथे काही दिवसांपासून मला विजय गेहलोत चेष्टा मस्करी करीत, मारहाण करीत होता. मला त्याठिकाणी राहण्यास मज्जाव करून हाकलून देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.