नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सातपूर औद्योगिक वसाहतीतील (Satpur Industrial Estate) एका कंपनीत प्लॅन्ट हेड असताना गैरव्यवहार केल्याने त्यास कामावरून काढून टाकल्यानंतर त्याने शिरजोरी करत कंपनी मालक असलेल्या मायलेकींविरोधात खोट्या तक्रारी दाखल करुन त्यांच्याकडून पैसे (Money) उकळले. यावरच न थांबता त्याने गेटबाहेर मायलेकींना गाठून कंपनीच्या आवारात आल्यास बलात्कार, तसेच खोट्या केसेस करण्याची धमकी देत, प्रकरण मिटवायचे असेल तर ५० लाखांची मागणी केली. या भितीपोटी पीडित मायलेकींनी सरकारवाडा पोलीस ठाणे (Sarkarwada Police Station) गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब दत्तात्रय भोर (५०, पंचवटी) असे संशयित प्लॅन्टहेड व खंडणीखोराचे नाव आहे. ५६ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीनुसार, त्यांची सातपूर औद्योगिक वसाहतीत वाहनांचे स्पेअर पार्टस् बनविण्याची कंपनी होती. २०११ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाल्याने कंपनीचे सर्व कामकाज प्लॅन्टहेड म्हणून भोर पाहू लागला. यानंतर, २०१७ पासून पीडितेसह मुलींनी (Girl) कंपनीचे कामकाज पाहिले असता भोरने अनेक गैरव्यवहार करुन कंपनीची व संचालकांची फसवणूक (Fraud) केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संशयित भोर यास मे २०१७ मध्ये कामावरुन कमी करण्यात आले. परंतु त्यानंतरही त्याने कंपनीविरोधात अनेक ठिकाणी खोट्या तक्रारी केल्या.
याचा परिणाम कंपनीच्या कामावर होऊ लागल्याने पीडित मायलेकींनी त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी सामोपचाराने त्यास पैसे दिले. तसेच, त्याच्याकडून पुन्हा अशा तक्रारी होणार नाहीत असे लेखी घेतले. परंतु त्यानंतरही संशयित भोर याच्या तक्रारी सुरू होत्या. या प्रकाराला कंटाळून मायलेकींनी २०१९ पासून कंपनी बंद करुन दुसऱ्या राज्यात वास्तव्य सुरु केले. मात्र संशयित भोरच्या खोट्या तक्रारी सुरूच होत्या. त्यामुळे नाशिकला (Nashik) आल्यानंतर मायलेकी कंपनीला भेट देत पाहणी करत होत्या. उद्योग भवनातून बाहेर निघत असताना संशयिताने मायलेकींना शिवीगाळ करीत ५० लाख द्या नाहीतर शांततेने जगू देणार नाही, असे धमकावले.
बलात्काराची धमकी
१५ फेब्रुवारी रोजी पीडित मायलेकी उद्योग भवनातून बाहेर पडल्यानंतर संशयित भोर याने त्यांना पुन्हा शिवीगाळ करीत, पोलिसात तक्रार केल्यास कंपनीच्या आवारातच दोघींवर बलात्कार करण्याची धमकी दिली. तसेच, तुमच्याविरोधात तक्रार करीत राहील. यापासून सुटका पाहिजे असेल ५० लाखांची मागणी केली. त्यासाठी महिनाभराची मुदत दिली. मुदत संपत आल्याने अखेर त्यांनी नाईलाजास्तव सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.