इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar Police Station) गुन्हे शोध पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करत परराज्यातील दोन सराईत सोनसाखळी चोरांना (Thieves) ताब्यात घेतले आहे. मयुर दिनेश बजंरगे आणि जिग्नेश उर्फ जुगनू दिनेश घासी (रा. दोघेही अहमदाबाद गुजरात असे ताब्यात घेण्यात आलेला संशयितांचे (Suspected) नाव आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र कर्नाटक व गुजरात राज्यात एकूण १८ गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी स्टॉप अँड सर्च टवाळखोरांवर कारवाई करत असताना शुक्रवारी (दि ८) रोजी सायंकाळच्या सुमारास गुन्हेशोध पथकाचे (Crime Squad) पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, सागर परदेशी, योगेश जाधव, सागर कोळी, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड प्रमोद कासुदे हे मदिना लॉन्स वडाळागाव या परिसरात गस्त घालत होते.
दरम्यान, यावेळी पथकाला वडाळा गावच्या (Wadala Village) दिशेने भरधाव वेगात दुचाकी जाताना दिसली. त्यांनी दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी अधिक वेगाने दुचाकी चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करत दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. यानंतर त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी(दि ०५ ऑगस्ट) रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना पुढील तपास कामी उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सपोनि कल्पेश दाभाडे अधिक तपास करीत आहेत.





