नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गरजवंतांना व ओळखीतील नागरिकांना हेरुन त्यांना तत्काळ लोन मंजूर करुन देत त्यातील पैशांतून (Money) आयफोन (I Phone) खरेदीचा नाद पूर्ण करीत त्यांची स्वस्तात विक्री करुन मौजमजा करणाऱ्या बेरोजगार तरुणाला (Youth) खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. सुमीत संजय देवरे (वय ३०, रा. अथर्व पार्क, शरदचंद्र पवार मार्केट यार्डमागे, सद्गुरूनगर, नाशिक, मूळ रा. करंजाळी, ता. बागलाण) असे संशयित बेरोजगाराचे नाव आहे. त्याच्यावर नाशिकसह इतर जिल्ह्यांत फसवणुकीसंदर्भाने (Fraud) पाचहून अधिक गुन्हे असून त्याने आतापर्यंत २५ जणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
तक्रारदारांचा आकडा वाढून फसवणुकीतील रक्कम २५ ते ३० लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. शहरात गेल्या दोन वर्षांपासून मोबाईलच्या माध्यमातून कमी-अधिक रकमेचे अर्ज मंजूर करुन देण्याचे सांगत नागरिकांना व ओळखीतील लोकांना गंडा घातल्याप्रकरणी संशयित देवरे, त्याचा मित्र प्रतीक सोनटक्के व संतोष कांबळे यांच्यावर गंगापूर व म्हसरुळ पोलिसांत (Gangapur and Mhasrul Police Station) दोन गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी देवरेचा मित्र व प्रकरणांत मध्यस्थी करणाऱ्या एकाला अटक केली होती. मात्र, देवरे पसार असल्याने त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यातच, देवरे हा पोलिसांना चकवा देत होता.
त्यानुसार, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी जग्वेंद्रसिंह राजपूत व पथक मागील काही दिवसांपासून त्याच्या मागावर असताना, (दि. ८) अंमलदार भूषण सोनवणे, सोनव रवींद्र दिघे व चारुदत्त निकम यांना देवरे हा मुंबईतून नाशिकमधील (Nashik) बळी मंदिराजवळ येणार असल्याची माहिती समजली. त्यानुसार, पथकाने इगतपुरी ते बळी मंदिरापर्यंत (आडगाव शिवार) चार सापळे रचले. तेव्हा देवरे हा बळी मंदिराजवळ येताच रात्री नऊ वाजता त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्यांची कबूली दिल दिली असून त्याचा ताबा गंगापूर पोलिसांकडे (Police) सोपवला आहे.
अनेक जण फसले, हप्ते बाऊन्स
देवरे व साथीदारांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. ‘मी हप्ते भरेल, काळजी करु नका’ असे तो पटवून दिल्यावर झोल करत होता. दरम्यान, ज्यांच्या नावावर कर्ज घेतले आहे, त्यांना आता संबंधित बँक व संस्था कर्जाचे हप्ते भरण्यासाठी संपर्क करीत आहे. देवरेने इतरांच्या नावे कर्ज स्वरुपात रक्कम व मोबाईल घेऊन त्यांचा विश्वास संपादन करून कर्जाची पूर्ण रक्कम न देता एक लाखाचे कर्ज मंजूर झाले तर, संबंधिताला १० ते १२ हजार रुपये देऊन बोळवण केल्याचे समोर आले आहे.
तक्रारी व गुन्हे वाढणार
देवरे व इतरांविरोधात नाशिकमध्ये ३० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या प्राथमिक दाव्यानुसार, त्याने अनेकांची ३० लाखांहून अधिकची फसवणूक केल्याचे पुढे येत आहे. ज्यांची अशाच पद्धतीने फसवणूक झाली आहे, त्यांनी संबधित पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन राजपूत यांनी केले आहे.
फसवणुकीची पद्धत
बेरोजगार असलेला देवरे मूळचा बागलाणच्या करंजाळचा आहे. तो गेल्या नऊ वर्षांपासून पंचवटीत वास्तव्यास आहे. तो अविवाहित असल्याचे समजते. दरम्यान, ज्या मित्रांना व ओळखीतील नागरिकांना इंन्स्टंट लोन (कर्ज) हवे आहे, त्यांना तो विश्वासात घेऊन लोन मंजूर करु देतो, असे सांगायचा. त्यासाठी संबंधितांची कागदपत्रे घेत त्यांच्याच नावाने कर्ज मिळवल्यावर आलेले पैसे स्वतःच्या व मध्यस्थींमार्फत इतर खात्यावर वर्ग करुन मुंबईत जाऊन मौजमजा करीत होता. त्यातच, अनेकांच्या नावावर त्याने कर्जाऊ स्वरुपात २० हून अधिक आयफोन व व्हिवो मोबाईल खरेदी केले आहेत. हे फोन काही दिवसांतच तो ४० ते ६० हजार रुपयांत विक्री करुन आलेल्या पैशांतून मद्यपान व इतर चैनीच्या वस्तू घेऊन हौस भागवत होता, असे पुढे आले आहे.
ठळक मुद्दे
- झोलमध्ये देवरेचे दोन ते तीन साथीदार.
- ६० ते ७० हजारांच्या आयफोनची कवडीमोल भावात विक्री.
- आलेल्या पैशांतून मौजमजा, मुंबई, पुणे वारी.
- बागलाण येथेही जाणार तपास पथक.
- तक्रारदारांत म्हसरुळ, सिडकोतील नागरिक.
- देवरे सध्या पोलीस कोठडीत
- तक्रारी वाढणार.





