नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या अनेक महिन्यांपासून पाथर्डी गावालगत सुरळीत सुरु असलेल्या सराईत गुन्हेगार (Criminal) समीर उर्फ छोटू पठाणचा अलिशान जुगार अड्डा काही कारणांस्तव उद्ध्वस्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा (Crime Branch) युनिट दोनने केली असून कारवाईत तब्बल साठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीच हा जुगार अड्डा का नष्ट करण्यात आला नाही याबाबत चर्चा सुरु झाली असून आतापर्यंत केलेल्या कारवायांत ही सर्वात मोठी कारवाई आहे.
इंदिरानगर हद्दीतील (Indiranagar Area) पेरुची बाग परिसरातील शेतात एअर कूलरच्या सोयीसुविधायुक्त हा जुगार अड्डा मंगळवारी (दि. २२) मध्यरात्री छापा (Raid) टाकून उद्ध्वस्त करण्यात आला.कुख्यात टिप्पर गँगचा म्होरक्या छोटू उर्फ समीर पठाण याच्या सेटिंग्जने हा जुगार अड्डा सुरु होता, असे समोर आले आहे. काठेगल्ली येथील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढतेवेळी दगडफेक करणाऱ्या संशयितांत पठाणचा सहभाग आढळल्याने तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
युनिट दोनचे अंमलदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना पाथर्डी गाव शिवारातील फ्लाईंग कलर्स स्कूलसमोर असलेल्या शेतातील शेडमध्ये तीनपत्ती जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशाने युनिट दोनचे प्रभारी सहायक निरीक्षक हेंमत तोडकर यांच्या पथकाने अड्ड्यावर (दि. २२) रात्री छापा टाकला. शेडमध्ये एअर कुलरसह जुगारांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, जुगाराचे (Gambling) साहित्य व १५ दुचाक्यासह रोख रक्कम, पाच कार, एक रिक्षा, मोबाईल असा ६० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन जागा मालकांसह क्लबचालक संशयित समीर पठार याच्यासह २९ जणांविरोधात
इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक निरीक्षक समाधान हिरे, उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, शंकर काळे, गुलाब सोनार, विलास गांगुर्डे, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी यांनी केली.
आकडे लावणारे संशयित
वसीम अन्वय शेख (४१, रा. पळसेगाव) हा काऊंटवर आढळून आला. तर, समीर पठार या अड्ड्याचा भागीदार आहे. दरम्यान, विशाल प्रल्हाद आहिरे (४४, रा. देवळाली गाव), फारुख गुलाब शेख (४९, रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर), अजय राजू पडघन (२९, रा. जाधव संकुल, अंबड), दीपक रामतेज मौर्या (३४, रा. जाधव संकुल, अंबड), गणेश भास्कर खैरे (४४, रा. नांदूडीं, ता. निफाड) या कामगारांसह सुनील सदाशिव जाधव (४१, रा. मुळेगाव, ता. त्र्यंबक), भूषण सदाशिव केंदाळे (३३, रा. नाशिकरोड), अनिल देवराम खरात (४७, रा. ब्राह्मणगाव, ता. निफाड), भाऊराव मल्हारी धनगर (४२, रा. हरसूल, ता. त्र्यंबकेश्वर), शेखलाल शेखनूर शेख (५४, रा. इस्लामपूर, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड), जावेद रज्जाक शेख (४०, रा. खडकाळी, भद्रकाली), सागर प्रल्हाद बुलाखे (३९, रा. देवळाली कॅम्प) हे तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आले.