नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उंटवाडी रोडवरील संभाजी चौकालगत सहा जणांच्या टोळक्याने नितीन शंकर शेट्टी (वय ३२) या सराईतावर कोयता व तलवारीने हल्ला करुन निघृण हत्या (Murder) केली. ही घटना शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजता येथील क्रांतीनगर परिसरात घडली असून मुंबई नाका पोलिसांनी तपासचक्रे फिरवून दहा तासांत पाच जणांना अटक (Arrested) केली आहे. नितीनने संशयितांपैकी एकाच्या इडली विक्रीच्या गाडीला लाथ मारली होती.त्यातून, हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे. क्रूरतेच्याही सीमेने कळस गाठल्याची ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
रोशन अशोक निसाळ (वय २३), गणेश यादव लाखन (वय ३१, दोघे रा. क्रांतीनगर, उंटवाडी रोड, नाशिक), नितीन दिलीप गांगुर्डे (वय २३), गोविंद सुभाष निसाळ (वय- २३), राजेंद्र लाखन (तिघे रा. वाघाडी, पंचवटी) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांच्यातील अनेकांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. मृत नितीन शेट्टी हा सध्या बेरोजगार होता. त्याच्यावर प्राणघातक हल्ल्यासह (Attack) छेडछाड, गंभीर दुखापत व अन्य स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. दरम्यान, (दि. ६) रोजी सकाळी नितीन व संशयितांत वाद झाले होते.
हा वाद तात्पुरता मिटला असतानाच, सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास नितीन हा क्रांतीनगर येथील घरात होता. त्याचे कुटुंब बाहेर असताना घरात लहान मुले खेळत होते. त्याचवेळी सहा संशयित मोपेडवरुन हातात तलवार आणि कोयता, पहार घेऊन आले. नितीन बाहेर दिसताच, त्याच्याशी वाद उकरुन काढत त्याच्या पोटावर, छातीवर आणि हातावर धारदार तलवार आणि कोयत्याने हल्ला चढविला. खोलवर जखम झाल्याने तोरक्ताच्या थारोळ्यात पडला. तरीही संशयितांची दया न दाखविता त्याच्यावर हल्ला सुरुच ठेवला. परिसरात आरडाओरड झाल्याने संशयित पसार झाले. स्थानिकांसह पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत नितीनला जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू (Death) झाला.
दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली. माहिती कळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त संदीप मिटके, नितीन जाधव, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे व गुन्हेशाखेची पथके दाखल झाली. मुंबईनाका पोलिसांनी तपासचक्रे फिरवून सहापैकी चार तर, युनिट एकने राजेंद्र लाखन या पाचव्या संशयितास ताब्यात घेतले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.याबाबत संशयितांवर मुंबई नाका पोलिसांत गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर नितीनच्या नातलगांसह मित्रपरिवाराने जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. सहायक निरीक्षक सुधीर पाटील करत आहेत.
हत्येचा थरार कैद
सायंकाळी टोळके हातात धारदार हत्यार नाचवून परिसरात आले. नितीन दिसताच त्याच्यावर सपासप वार केले. भरदिवसा डोळ्यादेखत क्रूरपद्धतीने तरुणावर वार केले जात असल्याचे पाहून सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला. त्यामुळे काही मिनिटांत परिसरात दहशत पसरुन आजूबाजूच्यांची भंबेरी उडाली. आरडाओरड, गोंगाट झाल्यानंतर काही मिनिटांत परिसरात नीरव शांतता पसरली. हत्येचा हा घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. त्यात मारेकऱ्यांचे चेहरे व वर्तन ठळकपणे कैद झाले आहे. शनिवारी नितीनच्या मृतदेहाचे (Dead Body) शवविच्छेदन करून तो नातलगांच्या ताब्यात देण्यात आला.