नाशिक | प्रतिनिधी | Nashik
परदेशात साखर पाठवण्याच्या बहाण्याने महिला व्यावसायिकाकडून साखर खरेदीच्या बहाण्याने आणि विलंब शुल्कच्या नावे २ कोटी ६२ लाख ८३ हजार ३८२ रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) २९ जुलैला संशयितांविरोधात फसवणुकीसह (Fraud) अपहाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयितास गुंडाविरोधी पथकाने वसई-विरार भागातून ताब्यात घेतले. अमित अनंत महाडिक (रा. विरार) असे संशयिताचे नाव आहे.
रिता गौरव दाणी (रा. नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या साखर निर्यातीचा व्यवसाय जानेवारी २०२३ पासून करतात. मुंबईतील स्टर्लिंग पॉवर जिनेसीस कंपनीने श्रीलंका येथे १२ हजार मेट्रिक टन साखर (Sugar) पाठवण्याची ऑर्डर दाणी यांना दिली होती. त्यामुळे दाणी यांनी संशयित अमित महाडिक यास साखर खरेदी करण्यास सांगितले. संशयित महाडिकने कोल्हापूर येथून साखर खरेदी केल्याचे सांगत २० कंटेनर साखर शिपिंग कं पनीमार्फत श्रीलंकेत पाठवत आहे, असे सांगितले.
प्रत्यक्षात महाडिकने साखर खरेदी केली नसल्याचे उघड झाले.तर इतर दोघांनी दाणी यांना दिलेल्या ऑर्डरप्रमाणे साखर खरेदी न करता गंडा घातला. त्यामुळे दाणी यांनी महाडिकसह इतर संशयितांना (Suspect) साखर खरेदीसाठी व इतर कामांसाठी दिलेली सुमारे अडीच कोटी रुपयांची रक्कम संशयितांनी बळकावत गंडा घातला व पैसे (Money) परत करण्यासही नकार दिला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वसईतून संशयित अटकेत
संशयितांची कोणतीही माहिती मिळत नसल्याने ते फरार होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने तांत्रिक व खबऱ्यांच्या आधारे पालघर जिल्ह्यातील वसई विरार येथून संशयित अमित यास पकडले. त्याचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.