नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मद्याच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून मुलाने जन्मदात्याच्या पोटात चाकू खुपसल्याची घटना पंचवटीतील (Panchvati) पेठरोड परिसरात (Peth Road Area) घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पित्याची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सुमारे चाळीस दिवसांनंतर उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला असून, पंचवटी पोलिसांनी संशयित मुलाला खुनाच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या आहेत.
सखाराम पंडित भावसार (वय ६५) आणि त्यांचा मुलगा अश्विन सखाराम भावसार (वय ३५) हे दोघेही पंचवटीतील पेठ रोडवरील नवनाथनगरातील रोकडे चाळीत भाडेतत्तवावर राहत होते. हे दोघेही कृषी उत्पन्न बाजार समितीत (मार्केट यार्ड) खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करत होते. पाच-सहा वर्षांपूर्वी पत्नीच्या निधनानंतर सखाराम हे मुलासोबतच राहत होते. दरम्यान, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारास दोघेही मद्याच्या नशेत असताना त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या अश्विनने धारदार चाकू वडिलांच्या पोटात खुपसला.
दरम्यान, घटनेनंतर सखाराम यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी ‘मविप्र’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले. मात्र, सखाराम यांना आधीच काही शारीरिक व्याधी होत्या. त्यातच जखमेमुळे शरीरात अंतर्गत संसर्ग वेगाने पसरला. प्रकृती पुन्हा खालावल्याने अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू (Death) झाला.
खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) वैद्यकीय आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे, या घटनेची नोंद खुनाच्या गुन्ह्यात केली आहे. संशयित मुलगा अश्विन याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील करत आहेत.





