नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात भयमुक्त मकरसंक्रांत (Makar Sankarat) साजरी होण्यासाठी पोलिसांनी (Police) नायलॉनसह घातक मांजा वापरण्यावर बंदी लागू करुन विक्रेत्यांसह वापरकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. आतापर्यंत चार संशयितांना (Suspected) पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर यापुढे नायलॉन संदर्भातील गुन्ह्यांत कार्यरत संबंधितांच्या तडीपारीसह मोक्कांतर्गत कारवाईचा निर्णय आयुक्तालयाने घेतला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशान्वये, तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नायलॉन मांजांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार साध्या वेशातील पोलीस गस्त देत तपासणी करत आहेत. सणोत्सवांच्या काळात पतंगबाजी वाढल्यावर नायलॉनच्या मांजामुळे होणारी जीवित हानी अथवा गंभीर दुखापत रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. संबंधितांवर गुन्हे नोंद केले जात आहेत.
नायलॉन मांजा खरेदी-विक्री व वापरकर्त्यांची साखळी मोडित काढणार आहोत. संशयितांवर तडीपारी प्रस्तावित करण्याचे आदेश दिले आहेत. नायलॉन विक्री, साठे करणाऱ्यांत सराईतांची टोळी असल्यास मोक्काचीही कारवाई करणार आहोत.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त
मुद्दे
- भद्रकाली हद्दीत २८ डिसेंबर २०२० रोजी नायलॉन मांजाने मान कापल्याने महिलेचा मृत्यू, भद्रकाली पोलिसांत गुन्हा
- संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरु
- सहायक पोलीस आयुक्तांकडून तडीपारी, मोक्कासंदर्भात प्रस्तावाची कार्यवाही
- सन २०२४ मध्ये संक्रांतीनिमित्त झालेल्या पतंगबाजीमुळे शहरात १९ तरुण जखमी
- जानेवारी २०२४ मध्ये शहरातून नायलॉन मांजाप्रकरणी ४२ जण तडीपार
- ८ नोव्हेंबर २०२५ रोजी वडाळा गावातील माळी गल्लीत मांजामुळे दुखापत होत अतिरक्तस्त्रावामुळे नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू
- संक्रांतीपूर्वी १२ जानेवारी २०२५ रोजी नायलॉनप्रकरणी २४ गुन्हे नोंद, ३३ संशयितांचा समावेश, अल्पवयीनांवरही कारवाई
- जानेवारी २०२५ महिन्यात नायलॉनबाबत ८२ गुन्ह्यांची नोंद; विक्रेते, साठेबाज तडीपार
- संशयितांच्या हालचाली, कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीला भय, धोका किंवा दुखापत झाल्यास संबंधितांवर तडीपारी प्रस्तावित
- नायलॉन मांजा वापरणाऱ्या बालकांच्या पालकांवरही गुन्हे नोंदविण्याचा इशारा




