नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सराईत खंडणीखोर वैभव देवरे आणि आता रोहित कुंडलवाल बापलेकाकडून सुरु असलेली अवैध सावकारी उजेडात येताच शहर पोलिसांनी (City Police) कठोर कारवाई अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, शहरातील खासगी सावकारांचे कृत्य आयुक्तालयामार्फत हेरले जाणार असून, या स्वरुपाच्या तक्रारींवर तातडीने कारवाईचे (Action) आदेश संबंधित पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना देण्यात आले आहेत. खासगी सावकारीसंदर्भातील तक्रारींचा त्वरित निपटारा करुन संशयितांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी दिले आहेत.
शहरात खासगी सावकारांनी नागरिकांकडे बसुलीचा तगादा लावत खंडणी मागण्यासह महिलांचा विनयभंग करण्याचे गंभीर प्रकार सुरु आहेत. जाच व छळ असह्य होताच, अनेक तक्रारदार व पीडित पोलिसांत (Police) तक्रार करण्यास घजावत असल्याने या स्वरुपाचे गुन्हे उघड होऊ लागले आहेत. आता पोलीस यात आणखी खोलवर तपास करून अवैध सावकारांचा शोध घेऊन त्यांची पाळेमुळे उखडून टाकणार आहेत. शहरात दोन वर्षांपूर्वी खासगी सावकारीला त्रासून सातपूरच्या बापलेकासह जेलरोडला तरुणांनी तर पाथर्डी फाटा परिसरात एका नवविवाहित दाम्पत्याने आत्महत्या केली होती.
गतवर्षी खासगी सावकार वैभव देवरे याच्या टोळीचे कारनामे जाहीर झाल्याने तब्बल पंधरा गुन्हे नोंदवण्यात आले. देवरेच्या सावकारीत त्याच्या पत्नीसह नातलगांचाही समावेश होता. यापाठोपाठ पंचवटी व सातपूर परिसरात गेल्या आठवड्यात महिला सावकारांविरुद्ध गुन्हे नोंद झाले. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचा सरचिटणीस रोहित कुंडलवाल व त्याचे वडील कैलास यांनी जुने नाशिक परिसरातील व्यावसायिक दाम्पत्याकडून खासगी सावकारीतून अतिरिक्त व्याज वसूल करून पन्नास लाखांची खंडणी मागून दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत दाम्पत्याला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यांच्यावर भद्रकाली पोलिसांत खंडणीसह लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी त्याला अटक (Arrested) केल्याने नाशिक न्यायालयाच्या आदेशान्वये तो आता पोलीस कोठडीत आहे.
सावकारीचे वीस हून अधिक गुन्हे
अवैध सावकारांकडून नागरिकांचे आर्थिक शोषण होत असून, या सराईत गुन्हेगारीला प्रतिबंध करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतला आहे. त्यानुसार वैभव यादवराव वरे याच्यासह त्याची पत्नी सोनल वैभव देवरे, गोविंद पांडुरंग ससाणे व निखील नामदेव पवार या संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. तर नाशिक शहरात अनेक संशयितांवर अवैध सावकारी व तत्सम कलमांसह खंडणी, विनयभंग व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे नोंद आहेत. त्यात अनेक जण अटकेत असून काही जामिनावर आहेत. तसेच यात काही महिला संशयितांचाही सहभाग समोर आला आहे.
वैभव देवरे टोळीचे कारनामे
- विविध पोलीस ठाण्यांत १५ गुन्हे नोंद
- ६३.४९ लाख रुपयांची फसवणूक
- जमिनीच्या बनावट कागदपत्रांद्वारे पीडितेला फसवले
- ३५ लाख रुपयांची खंडणी
- मूळ रक्कम परत करण्याऐवजी अधिक पैसे उकळले
- धमक्या देणे, पीडितेवर खोटे आरोप करणे,
- घरातून साहित्य नेणे