नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
हॉटेल ऑरा बार गोळीबारप्रकरणी (Hotel Aura Bar Firing Case) न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रकाश लोंढेसह (Prakash Londhe) त्याच्या मुलगा दीपक लोंढे (Deepak Londhe) याच्यावर बंगला बळकावून खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
फिर्यादी प्रमोद मधुकर अत्तरदे (वय ५४, रा. एकता ग्रीन व्हॅली, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित प्रकाश लोंढे, दीपक लोंढे आणि भूषण लोंढे यांनी त्यांचा खुटवडनगर परिसरातील सर्वे क्र. ५१, प्लॉट क्र. २ या ठिकाणी असलेला पुष्कर बंगला अनाथाश्रम सुरु करण्याच्या नावाने भाडेतत्वावर घेतला. भाडे करारनामा आठ दिवसांत करून देण्याच्या बोलीनंतर लोंढे यांनी या बंगल्याचा भाडे करारनामा केलाच नाही व २०२१ ते अद्यापपर्यंत भाडे देखील दिले नाही. अत्तरदे हे त्यांच्या बंगल्यावर गेले असता त्याठिकाणी त्यांना लोंढे यांचे संपर्क कार्यालय असल्याचे दिसून आल्याने त्यांना अनाथ आश्रमबाबत विचारणा केली असता दीपक व भूषण लोंढे यांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर काही काळाने त्या ठिकाणी सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुंभ हे कुटुंबीयांसह राहत असल्याचे आढळून आले. अत्तरदे यांनी या दोघांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की ‘बॉस प्रकाश लोंढे यांनी सांगितले आहे की हा बंगला तुम्हाला हवा असल्यास दोन कोटी रुपये द्यावे लागतील.’ हे ऐकून अत्तरदे यांनी विरोध दर्शविला असता, संशयितांनी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) लोंढे पिता-पुत्रांसह अन्य दोघांवर खंडणी व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सातपूर पोलीस ठाण्यातील (Satpur Police Station) दाखल गुन्ह्यात प्रकाश लोंढे व त्याचा मुलगा दीपक लोंढे यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) करण्यात आली होती. अंबड पोलिसांनी शनिवारी (दि. १८) त्यांचा ताबा घेत त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याने आता लोंढे पिता-पुत्राची दिवाळी अंबड पोलीस ठाण्याच्या तुरुंगात होणार आहे.
दुसऱ्या अनधिकृत बंगल्यावरही हातोडा?
सातपूर येथील आयटीआय सिग्नलवरील हॉटेल ऑरा बार गोळीबार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे याच्या अनधिकृत घराची पोलिसांनी झाडाझडती केली होती. त्यानंतर त्याची एक इमारत पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली होती. आता महापालिकेने त्याच्याच बाजूला असलेल्या दुसऱ्या बंगल्याला नोटीस चिटकवून ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.गेल्या आठवड्यात (दि. १५ व १६) दोन दिवसात लोढे याच्या आयटीआय पुलालगत असलेल्या नंदिनी नदीच्या पूररेषेत असलेला अनधिकृत बंगल्यावर महापालिकेतर्फे हातोडा चालवण्यात आला होता.त्यानंतर त्याच्याच बाजूला लोंढेच्या नंदिनी नदीच्या पूररेषेत असलेल्या अनधिकृत बंगल्यावर नोटीस चिटकवून सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला.महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरकर, सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव, कार्यकारी अभियंता बांधकाम गांगुर्डे, अतिक्रमण प्रमुख तानाजी निगळ संजय कोठुळे त्यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात लोंढे याच्या अनधिकृत बंगला नोटीस चिटकवली.





