नाशिक | प्रतिनिधी | Nashik
घराजवळील जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेचा अनोळखी संशयितांनी जबर मारहाण करून छळ करत, गळा आवळून निर्घुण खून (Murder) केला. ही घटना पेठ तालुक्यातील (Peth Taluka) रुईपेठ (Ruipeth) येथे घडली. पीडितेचा घातपात किंवा सामूहिक बलात्कार केल्याचा दावा काही संघटनांनी केल्यावर ओरड उठताच जिल्हा रुग्णालयाने एका समितीसमक्ष इनकॅमेरा शवविच्छेदन केले. त्यात हा धक्कादायक प्रकार उघड झाला. अहवाल मिळताच ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
रुईपेठ येथील २१ वर्षीय गर्भवती (Pregnant) सरपण आणण्यासाठी जंगलात गेली होती. गंभीर जखमी झाल्याने तिला गुरुवारी (दि.२०) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू (Death) झाला. दाखल एमएलसीनुसार पाय घसरून पडल्याने ती जबर जखमी झाल्याचे कळवण्यात आले. तर काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पीडित गर्भवतीचा घातपात झाल्याचा संशय वर्तवला.
दरम्यान, त्यामुळे महिलेचे (Woman) शवविच्छेदन इनकॅमेरा करण्यात आले. सहा सदस्यीय तज्ज्ञ समितीत दोन महिला गायनॅकोलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन, फॉरेन्सिक एक्स्पर्ट, पोलीस अधिकारी तसेच चमूने, तज्ज्ञ समितीने महिलेचे शवविच्छेदन केले. त्यात तिला जबर मारहाण करून पोटात लाथा मारून ही हत्या केल्याचे उघड झाले. तसेच खबरदारी म्हणून महिलेचा व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस (Police) चौकशी केली जाणार आहे.