नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बोगस शिक्षक आणि लिपिक पदावर बोगस भरती केल्याप्रकरणी मालेगावातील (Malegaon) दोन स्वतंत्र पोलीस ठाण्यांत शिक्षण संस्थाचालकांसह मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांविरुद्ध दाखल गुन्ह्यांतही संशयाची सुई शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष संशयित नितीन उपासनी (Nitin Upasani) याच्याभोवती फिरते आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांपाठोपाठ आता ग्रामीण पोलिस दलातील (Rural Police Force) आर्थिक गुन्हे शाखा (इओडब्ल्यू) उपासनीचा ताबा घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
मालेगावात दाखल गुन्ह्यांमध्ये यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या प्रमुखांना अटक झाली होती. तीन कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई करुन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण श्रीधर पाटील (वय ५०), कार्यालय अधीक्षक सुधीर भास्कर पगार आणि उपशिक्षणाधिकारी उदय विठ्ठल देवरे (५२) या संशयितांना बेड्या ठोकल्या होत्या. याच प्रकरणांमध्ये संशयित उपासनीभोवती पोलिसांनी चौकशी सत्र राबविण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी उपासनीच्या चौकशीचा प्रयत्न केला होता. मात्र, शहर पोलिसांनी थेट अटकच केल्याने आता ग्रामीण पोलिसांनीही तपासाला वेग दिला आहे.
दरम्यान, जुलै २०२५ मध्ये पवारवाडी पोलिसांत (Pawar Wadi Police) दाखल गुन्ह्यात सेवाजेष्ठता डावलून तेरा शिक्षकांना मान्यता आणि वेतन अदा केल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार या दोघांचा सहभाग निष्पन्न झाला होता. मालेगाव छावणी पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संस्थाचालकांसह चार संशयित एप्रिल २०२५ मध्ये गुन्हा नोंद झाला. त्यामध्ये कर्मचारी भरतीला मान्याता देणाऱ्या जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी उदय देवरेचा सहभाग निष्पन्न झाला होता.
आर्थिक गुन्हेशाखेने केली होती उपासनीची चौकशी
मालेगाव येथील काही शिक्षण संस्था व शाळांमधील शिक्षक, सेवकांचे बनावट स्वाक्षरीद्वारे बोगस शालार्थ आयडी बनवून ते विक्री केल्याच्या गुन्ह्यात उपासनी याची काही महिन्यांपूर्वीच ग्रामीण आर्थिक गुन्हेशाखेने (इओडब्लू) चौकशी केली होती. मात्र, दबातवतंत्र वापरल्याने तो अटकेपासून दूर होता. आता, शहर पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी सुरु केल्याने ग्रामीण इओडब्लूनेदेखिल उपासनीकडे सखोल तपासासह चौकशीसाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी संबंधित यंत्रणांना पत्रव्यवहार केला आहे.
ठळक मुद्दे
- पवारवाडी पोलीस ठाण्यात बडी मालेगाव शाळेतील बोगस शिक्षक भरतीसंदर्भात गुन्हा
- पवारवाडीच्या गुन्ह्यात पाटील व पगार यांना अटक
- मालेगाव छावणी पोलिसांत या. ना. जाधव शाळेतील बोगस शिक्षक भरतीसंदर्भात गुन्हा
- छावणी पोलिसांतील गुन्ह्यात देवरेला अटक




