नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निघृण हत्याकांडाच्या तपासात नाशिक (Nashik) कनेक्शन समोर येते आहे. सध्या अटकेत असलेला विष्णू चाटे हा घटनेनंतर पसार असताना नाशिक शहरात येऊन गेला. खंडणी संदर्भाने ज्या मोबाईलवरुन संभाषण झाले तो मोबाईल फोन चाटे याने नाशिकमध्ये कुठेतरी फेकून देत पुरावा नष्ट केल्याचे कळते. दरम्यान, नाशिकमध्ये मोबाईल फोन कुठे फेकला हे आठवत नसल्याचे चाटे याने सांगून सीआयडीसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सीआयडीने मोबाईलचा शोध घेण्यासाठी तपास सुरु केल्याचे कळते.
चाटे याने मोबाईलवरून वाल्मिक कराडसोबत (Walmik Karad) पवनचक्की उभारणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोलणे करून दोन कोटींची खंडणी मागितली होती. खंडणी प्रकरण व नंतर घडलेल्या घडामोडीत मोबाईल हा महत्त्वाचा पुरावा तपास यंत्रणेला हवा आहे. सीआयडीने चाटे याचा जबाब घेतला असता मोबाईल नाशिकला फेकल्याचे त्याने सांगितले. तशी माहिती सीआयडीने केज न्यायालयात दिली. मोबाईल कुठे फेकला हे तो सांगू शकत नसल्याने सीआयडीला शोध घेण्यासाठी तांत्रिक मदत घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, सरपंच देशमुख हत्याप्रकरणात (Murder Case) आतापर्यंत पाच मोबाईल जप्त केल्याची माहिती असून सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. माहितीनुसार, विष्णू चाटेच्या मोबाईल वरूनच खंडणीची धमकी देण्यात आली होती. हत्या प्रकरणात देखील विष्णू चाटेचा मोबाईल महत्त्वाचा आहे. याच मोबाईल संदर्भामध्ये केज न्यायालयात युक्तिवाद चालू असताना सरकारी वकिलांना न्यायाधीशांनी प्रश्न केले होते. तर, संशयितांपैकी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.
कोयत्यासह वायर जप्त
सरपंचाची हत्या झालेल्या घटना स्थळाहून कोयता, वायर, काठी जप्त केली आहे. यातील दोन मोबाइल जयराम चाटे आणि महेश केदार यांचे आहेत. तर उर्वरित तीन मोबाइल कोणाचे आहेत, या विश्लेषणासाठी ते फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत.