नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नववर्षाच्या सुरुवातीलाच शहरात सायबर फसवणुकीचा (Cyber Fraud) गंभीर प्रकार उघडकीस आला असून, ऑनलाइन गुंतवणुकीवर बक्कळ परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल ७५ लाख रूपये लाटल्यात आले आहेत. त्यानुसार, सहा संशयितांविरोधात नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य संशयित हे महाराष्ट्रातील रहिवासी असून पती-पत्नी व त्यांचा मेहुणा असल्याचे निष्पन झाले आहे.
मिलिंद गाढवे, त्याची पत्नी प्रियंका गाढवे व तिचा भाऊ अर्जुन पाटील यांच्यासह निलेश व हेमंत जंगम अशी संशयितांची नावे आहेत. फिर्यादी हा त्र्यंबकरोडवरील महात्मानगर परिसरातील व्यावसायिक असून, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. ओळख वाढवून ‘शेअर मार्केट’ मधील गुंतवणूक, नफा कसा मिळतो, पैसे कसे वाढतात व परतावा कसा मिळतो, याची सविस्तर माहिती देत विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘झूम’ ऑनलाइन मीटिंगद्वारे अधिक नफ्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या टप्प्यांत गुंतवणूक (investments) करण्यास प्रवृत्त केले. शिवाय या टोळीने केवळ ऑनलाइनच नव्हे, तर नाशिकमध्ये प्रत्यक्ष सेमिनार व भेटी घेत विश्वास संपादन केला. या सेमिनारच्या माध्यमातून अनेक नागरिकांना आकर्षित करून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आल्याची माहिती उघड होत आहे.
फेब्रुवारी २०२५ ते १९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना व्यावसायिकाकडून रक्कम उकळण्यात आली. अखेर बंधन बँकेच्या संशयास्पद बैंक खात्यात ७५ लाख रुपये जमा करून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांचे (Suspected) लोकेशन ट्रेस करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यासाठी पथके खाना करण्यात आली आहेत, नववर्षातील हा पहिलाच सायबर गुन्हा असल्याने पोलिसांकडून तपासाला प्राधान्य देण्यात आले आहे.
मुद्दे
- २०२६ मधील नाशिक शहरातील पहिला सायबर गुन्हा
- सोशल मीडिया व झूम मीटिंगचा वापर
- स्थानिक संशयितांचा सहभाग
- सायबर पोलिसांकडून विशेष तपास पथक
- नाशिकमध्ये तक्रारदाराची प्रत्यक्ष भेट
- शहरातील नामांकित हॉटेलमध्ये सेमिनार
- विश्वास संपादन करण्यासाठी स्थानिक ओळखीचा वापर




