Tuesday, September 29, 2026
HomeनाशिकNashik Crime : अत्याचार प्रकरणातील आरोपी 'स्वघोषित कॅप्टन'ने स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर...

Nashik Crime : अत्याचार प्रकरणातील आरोपी ‘स्वघोषित कॅप्टन’ने स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक; सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप

मुंबई | Mumbai

नाशिक क्राइम ब्रांच युनिट-१ ने स्वत:ला ज्योतिषी म्हणून मिरवणाऱ्या अशोक खरात(Ashok Kharat) उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक केली आहे. एका ३५ वर्षीय महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा (Case) दाखल करत आज (बुधवारी) पहाटे चार वाजता खरात याला अटक केली.

- Advertisement -

अशोक खरात (Ashok Kharat) हा लोकांचे भविष्य सांगत होता. त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी येते होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली असता त्यांचा ‘हात’ बघितला होता. तेव्हापासून खरात चर्चेत आला होता.

दरम्यान, या कथित ज्योतिषाला अत्याचार प्रकरणात अटक झाल्यानंतर शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना पदावरून दूर करावे यासाठी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.

सुषमा अंधारेंनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

“कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली. खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे. अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत. विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता.

विशेष खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभागत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ? योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे?” असे अंधारेंनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

फिर्यादीत काय?

स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधात देण्यात आलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले की, स्वतः कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली मनात विश्वास संपादन केला. यानंतर त्याने ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला देऊन अत्याचार केला. २०२२ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू होता, असे तिने फिर्यादीत नमूद केले आहे.

कॅप्टन अशोक खरात कोण आहे?

कॅप्टन खरात हे मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहेत. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षांची कारकीर्द पूर्ण करताना कॅप्टन खरात यांनी १५४ देशांचे दौरे पूर्ण केले आहेत. त्यामुळे, या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नीतिमूल्ये, प्रगती, मागासलेपणा आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला असावा, असे मानले जाते. कॅप्टन खरातने आपले लक्ष ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) नावाच्या विज्ञानशाखेच्या अभ्यासाकडे वळवले, तेव्हापासून त्याच्या आयुष्याला रंजक वळण मिळाल्याचे सांगितले जाते. कॉस्मॉलॉजीने गेल्या १०० वर्षांत प्रचंड प्रगती साधली आहे. कॅप्टन खरात यांनी कॉस्मॉलॉजीचे शिक्षण आपल्या या क्षेत्रातील गुरू, कै. श्री. मुजुमदार साहेब, जे त्यावेळी ‘ऑस्ट्रेलियन मर्चंट शिपिंग विभागा’चे ‘सेलिंग विभाग प्रमुख’ आणि ‘स्वाक्षरी अधिकारी’ होते यांच्या विशेष आग्रहास्तव घेतले. आपल्या प्रशिक्षण काळात एकूण २७७ विद्यार्थ्यांमधून त्यांनी सुवर्णपदक पटकावले. मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर, कॅप्टन खरात सध्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे नेतृत्व करत आहेत. तसेच त्यांनी विश्व शास्त्राच्या क्षेत्रालाच आपली पुढील कारकीर्द म्हणून पुढे चालू ठेवल्याचे बोलले जाते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...