नाशिक | नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik
नाशिकरोड (Nashik Road) येथील करन्सी नोटप्रेस (सीएनपी) अर्थात चलनी नोटांच्या छपाई कारखान्याची बिहारच्या (Bihar) नालंदा येथील सात जणांनी फसवणूक (Fraud) केल्यावर बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी हडप करणाऱ्या एका संशयित केंद्रीय कर्मचाऱ्याचा मागमूस लागला आहे. विवेक सुरेशपाल सिंग पनवार (वय ३२, रा. पट्टी बोगन, जीएसआय कॉलेजजवळ, बागपत, उत्तरप्रदेश, सध्या रा. शिव ऑर्चिड, सिध्देश्वरनगर, पिंटो कॉलनी मागे, जेलरोड) असे संशयित सीएनपी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
त्याने सन २०२३ च्या विविध पदांच्या भरतीत (Recruitment) डिप्लोमा इन इंजिनिअरिंगच्या (प्रिंटीग) प्रमाणपत्राचे बनावटीकरण करून गैरमागनि नोकरी मिळविल्याचे समोर आले आहे. सन २०२२-२३ मध्ये सीएनपीने आयोजित केलेल्या भरती प्रक्रियेत बिहार येथील सात डमी परीक्षार्थी संशयित रवी रंजन कुमार, संदीप कुमार, शिशुपाल कुमार, आयुष राज, राजीव सिंग, संदीप कुमार व आशुतोष कुमार (सर्व रा. नालंदा, राज्य बिहार) यांनी काही उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेचे बनावट कागदपत्रे तयार करत गैरमार्गाने केंद्र सरकारची (Central Government) नोकरी बळकावल्याचे तपासात उघड झाले होते.
याबाबत करन्सी नोटप्रेसचे व्यवसाय उपप्रबंधक विक्रमसिंग सूर्यकांत चौधरी (रा. लॅम रोड, देवळाली कॅम्प, नाशिक) यांनी उपनगर पोलिसांत (Upnagar Police) संशयितांविरोधात भारतीय दंड विधान कलम ४७१, ४६८, ४६७, ४६५, ४२०, ३४, १२० ब आणि महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या आणि इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराबाबतचे कलम ७व ९ अन्वये फिर्याद नोंदविली होती. तर, पनवरने गैरमागनि नोकरी मिळवून पात्र उमेदवारांना वंचित ठेवून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक दाभाडे करत आहेत.
असा आहे प्रकार
करन्सी नोट प्रेसने नाशिक येथील कार्यालयासाठी कनिष्ठ टेक्निशियन (मुद्रण/नियंत्रण), कनिष्ठ टेक्निशियन (कार्यशाळा /इलेक्ट्रीकल) आणि पर्यवेक्षक या पदांसाठी मार्च २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत पवई येथील आयटी पार्कलगतच्या केंद्रात भरती परीक्षा घेतली होती. त्यात वरील सात जणांनी संगनमत करून डमी परीक्षार्थीना केंद्रावर पाठवले. त्यांनी उमेदवारांच्या जागी परीक्षा दिली आणि उत्तीर्ण होऊन पाच आकडी पगाराची नोकरी लाटली. विशेष म्हणजे संशयितांनी अंतिम परीक्षा व निवड प्रक्रियेत बनावट आयटीआय संस्थेचे प्रमाणपत्र, डिप्लोमा इन इंजिनियरिंग इलेक्ट्रिकलचे प्रमाणपत्र सादर केले. तपासात डमी परीक्षार्थी व उमेदवार बिहारचेच असून सीएनपीने नियमित तपासणी केली असता काही उमेदवारांचे कागदपत्रे संशयास्पद आढळली. यानंतर, अंतर्गत चौकशी करण्यात आल्यावर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. आता बोगस पद्धतीने नोकरी मिळविलेल्या काही जणांची ओळख पटली असून त्यात पनवारचा सहभाग आढळला आहे.




