नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एमडी ड्रग्ज तस्करीत (MD Drugs) ‘छोटी भाभी’ इरफान उर्फ चिपड्या व इतर संशयितांसोबत संपर्कात राहिल्याप्रकरणी निलंबित संशयित पोलीस अंमलदार युवराज शांताराम पाटील याला पोलीस आयुक्तालयाने (Police Commissionerate) फरार (Absconding) घोषित करुन बडतर्फ केले आहे. निलंबित केल्यानंतर नोटीस देऊनही युवराज पोलिसांसमोर हजर न झाल्याने त्याच्या बडतर्फीचे आदेश आयुक्तालयाने जारी केले आहेत.
सन २०२३ मध्ये वडाळा गावात (Wadala Gaon) ‘छोटी भाभी’च्या एमडी तस्करी प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनडीपीएस) तपासात शहर पोलीस (City Police) दलातील एका कर्मचाऱ्याचा सहभाग उघड झाला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये संशयित युवराज शांताराम पाटील याचे निलंबन करुन त्याला संबंधित गुन्ह्यात सहसंशयित केले होते.
त्याप्रकरणी पाटील याने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. गुन्ह्यात नाव निष्पन्न झाल्यापासून पाटील फरार असून, अमली पदार्थ विक्रीच्या संघटीतपणे टोळी चालविणाऱ्या गुन्ह्यांशी त्याचे संबंध असल्याने आयुक्त कर्णिक यांच्या आदेशान्वये बडतर्फ करण्यात आले आहे. युवराज पाटील याचा अनेक संशयितांसोबत (Suspected) वारंवार संपर्क व संभाषण झाल्याचे तपासात समोर आले आहे.
असा आहे युवराज…
* युवराजचा एमडी व गोवंश तस्करी गुन्ह्यातील संशयितांशी संपर्क
* इरफान उर्फ चिपड्यासोबत एका क्रमांकावरून १०० तर दुसऱ्या क्रमांकावरुन ५१२ कॉल्स
* छोटी भाभी हिच्यासोबत एका क्रमाकंवरुन २५१ तर दुसऱ्या क्रमांकावरून २७१ कॉल्स
* इम्तियाजसोबत एका क्रमांकावरून ६६ तर दुसऱ्या क्रमांकावरुन ७३ कॉल्स
* ‘एनडीपीएस’ गुन्ह्यातील संशयित अर्जुन पिवालसोबत एक, सागर शिंदेसोबत एक कॉल
* ‘एनडीपीएस’ गुन्ह्यातील संशयित शाहरुख शाहसोबत सोळा, अजय रायकरसोबत ४८, सदाशिव गायकवाडसोबत ९ कॉल्स