नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नामांकित कंपन्यांकडील मोबाईलच्या (Mobile) बनावट वस्तूंची विक्री करणाऱ्या महात्मा गांधीरोड येथील मोबाइल दुकानांवर गुरुवारी (दि. ९) गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने (Anti Gang Squad) छापेमारी केली. यामध्ये नामांकित कंपन्यांच्या नावाने विक्री होत असलेले सुमारे साडतीन लाखांचे बनावट मोबाईल साहित्य जप्त केले असून चार विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
एमजी रोड (MG Road) येथे नामंकित कंपन्यांचे बनावट साहित्य विक्री होत असल्यासंदभनि कॉपीराईट अँक्टची तक्रार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्याकडे दाखल होती. त्यानुसार, अंबिका शॉप, शिव शॉप, युनिक मोबाईल, व्हीनस मोबाईल या चार दुकानांवर छापा टाकला असता ॲपल तसेच आय फोनच्या डुप्लिकेट ॲक्सेसरीज मिळून आल्या. त्यामुळे चारही दुकानांवर कॉपीराईट कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. तपास सरकारवाडा पोलीस (Sarkarwada Police) करत आहेत. गुंडाविरोधी पथकातील सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकाने ही कारवाई केली.
बनावट साहित्य विक्री होत असल्याच्या तक्रारी
मोबाईल कव्हर, स्क्रीन गार्डपासून तर चार्जर, हेडफोन अशा विविध वस्तू घाऊक तसेच किरकोळ स्वरूपात विक्री महात्मा गांधी मार्गावरील दुकानांमध्ये केली जाते. यात प्रामुख्याने प्रधान पार्क व सभोवतालच्या इमारतींमध्ये आतपर्यंत दुकाने आहेत. तसेच समोरील बाजूलाही कॉम्प्लेक्समध्ये दुकाने आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजस्थानी व्यावसायिकांकडून भाडेतत्त्वावर दुकाने घेत व्यवसाय केला जातो. शहर परिसरातील नागरिक तसेच छोट्या स्वरुपातील मोबाईल विक्रेते येथे मोठ्या संख्येने वस्तू खरेदीसाठी येतात. या परिसरात सुमारे दीडशेहून अधिक छोटे-मोठेव्यावसायिक कार्यरत आहेत. यातील काही दुकानात नामंकित कंपन्यांचे बनावट साहित्य विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत.