नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायात भागीदारी देण्याचे सांगून तसे बनावट कागदपत्रे दाखवित एका बिल्डर दाम्पत्याने (Builders) तिघा बिल्डर व व्यावसायिकांकडून एकूण दोन कोटी ४५ लाख रुपये उकळले आहेत. आता सध्या हे दाम्पत्य पसार झाले असून, अंबड पोलिसांत (Ambad Police) त्यांच्यावर फसवणुकीसह (Fraud) अन्य कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असताना फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.
दिव्येश नरोडिया, नीलम नरोडिया (रा. ओम कॉलनी, अंबड लिंकरोड, नाशिक) अशी संशयित बिल्डर दाम्पत्याचे नाव असून त्यांनी संशयित दिनेश विरमगामा (रा. गजानन पार्क, गौरी शंकर मंगल कार्यालयाजवळ, अंबड लिंक रोड) व विमल विरमगामा (रा. सप्तश्रृंगी कृष्णा अपार्टमेंट, रामेश्वर नगर, अंबड लिंकरोड) यांच्या मदतीने अनेक नागरिकांसह बिल्डर, व्यावसायिकांना बांधकाम व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून हा गंडा घातला आहे. त्यानुसार, बिपीन नानजीभाई जोटासना (वय ३७, रा. उमावेशी अॅव्हेन्यू, ओम कॉलनी, महाजननगर, अंबड लिंकरोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. वरील संशयितांनी (Suspected) व्यवसायानिमित्त झालेल्या ओळखीतून मार्च २०२३ ते जून २०२४ या कालावधीत महाजननगर येथील शंभुराज हाईट्स येथे विविध बांधकाम प्रकल्पांबाबत व भागीदारीसंदर्भाने जोटासना यांच्याशी चर्चा केली.
संशयितांनी गजानन डेव्हलपर्स या फर्म अंर्तगत आडगावजवळील जत्रा चौफुली येथील विविध प्लॉटमध्ये वीस टक्के भागीदारी देतो, असे जोटासना यांना सांगितले. त्याबाबत १०० रुपयांच्या बॉन्ड पेपरवर जोटासना यांच्या नावे दहा टक्के तर, रविकुमार मेतालिया व निखीलकुमार मेतालीया यांच्या नावे प्रत्येकी पाच टक्के भागीदार बनविल्याचे ३० मार्च २०२३ च्या स्टॅमनुसार नोंदविलेले ‘डिड ऑफ पार्टनरशिप’चे बनावट दस्तऐवज बनवून ते दाखविले. जोटासना व इतरांचा विश्वास संपादन करताच संशयितांनी तिघांकडून धनाकर्ष व आरटीजीएसद्वारे एकूण दोन कोटी ४५ लाख रुपये उकळले. याबाबतच्या भागीदारीचे (Partnership) कागदपत्रे नोंदवून अटी व शर्तीचे उल्लंघन करुन ही फसवणूक केली. पैसे मिळताच संशयितांनी पळ काढला असून तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करत आहेत.
संगनमत करुन भागीदारीचे आमिष दाखविले
संशयितांनी संगनमत करुन भागीदारीचे आमिष दाखविले आहे. या तिघा तक्रारदारांव्यतिरिक्त अनेकांनी याच कारणातून फसवणूक झाल्याचा संशय पोलिसांना असून, ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तर, पसार असलेल्या संशयितांना लवकरच अटक केली जाणार असून त्यांच्या चौकशीतून अनेक तथ्य्य व खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.