नाशिक । प्रतिनिधी | Nashik
प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक (Arrested) केलेल्या सराईताने मंगळवारी (दि. २९) सायंकाळी अंमलदाराच्या हाताला हिसका देऊन भद्रकाली पोलीस ठाण्यातून (Bhadrakali Police Station) धूम ठोकली. या गंभीर प्रकारानंतर त्याचा शोध सुरु असताना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या मित्रास ताब्यात घेतल्यावर पोलिसांना आवश्यक माहिती मिळाली. यानंतर तांत्रिक विश्लेषणानुसार, भद्रकाली गुन्हेशोध पथकाने ४० किलोमीटर परिसर पिंजून काढत संशयित क्रिश किरण शिंदे (वय १९, रा. ५४ कॉर्टर्स, नानावली, जुने नाशिक) याला घटनेनंतर २४ तासांच्या आत इगतपुरीतून (Igatpuri) ताब्यात घेतले. शिंदे हा सराईत असून त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचे दोनहून अधिक गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, याबाबत कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याने संबंधित पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
काठे गल्लीतील (Kathe Galli) जयशंकर चौकातील संगम स्विट्सजवळ रविवारी (दि. २७) रात्री ८ वाजता अमोल हिरवे याच्यावर अज्ञातांनी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने दगडाने व कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, झोन एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव व भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक विक्रम मोहित यांच्या सूचनेने वरील गुन्ह्यातीस मारेकरी संशयित क्रिश व त्याच्या विधिसंघर्षित मित्रास गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार व पथकाने (दि. २८) ताब्यात घेऊन किंशला अटक केली होती.
या गुन्ह्याच्या पोलीस कोठडीदरम्यान (Police Custody) किश शिंदेला तपासकामी कोठडी बाहेर काढले असता त्याने अंमलदार तौसिफ नियाज सय्यद यांच्या हाताला झटका देऊन पोलीस स्टेशनबाहेर उभा असलेला मित्र किरण युवराज परदेशी (रा. कथडा) याच्या मोपेडवर बसून पळ काढला. पथकाने सीसीटीव्ही फूटेज पडताळून परदेशीला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने क्रिश शिंदेला रात्री आङगाव शिवारातील निलगिरी बागेत सोडल्याचे सांगितले. त्यानंतर तो कुठे गेला, याची माहिती नसल्याचे सांगितले.
दरम्यान, पथकाने क्रिशचा ठावठिकाणा नसतांना मानवी कौशल्य व तांत्रिक तपास करून २४ तासांच्या आत इगतपुरी शिवारातून ताब्यात घेतले, तपास पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते करीत आहेत. ही कारवाई हवालदार सतिष साळुंके, कय्यूम सय्यद, लक्ष्मण ठेपणे, अविनाश गुंद्रे, अंमलदार धनंजय हासे, जावेद शेख, गुरू गांगुर्डे, सागर निकुंभ, योगेश माळी, उत्तम खरपडे यांनी केली.
त्या गुन्ह्यातही वॉन्टेड
२४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पुणे रोडवरील घंटी म्हसोबा मंदिरामागील प्रो-चिक्न दुकानासमोरील रोडवर हर्षल राजेंद्र देवरे याच्यावर संशयित लखन काशीद, क्रिश शिंदे व त्यांच्या सहा साथीदारांनी ठार मारण्यासाठी धारदार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर दुखापत केली होती. त्यावरून उपनगर पोलीस ठाण्यात २५ एप्रिल २०२५ रोजी अतिविलंबाने गुन्हा दाखल आहे होता. दरम्यान, या गुन्ह्यात मुख्य सराईत शुभम हरगावकरला ताब्यात घेण्यात आले असून क्रिष शिंदे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.