नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील एका कंत्राटदाराचा (Contractor) आयफोन हिसकावून चोरट्यांनी (Thieves) ऑनलाइन पद्धतीने कंत्राटदाराच्या चालू खाते व ओडी खात्यातून परस्पर ३ कोटी ५० लाख रुपये इतर बँक खात्यात वर्ग केले होते. ज्या बँक (Bank) खात्यांत पैसे जमा झाले ती खाती गोठवली गेली आहेत. त्यानंतर दोन दिवसांत ते पैसे पुन्हा कंत्राटदारास सोपवण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे एक कोटी रुपये धुळे जिल्ह्यातील देवपूर येथील खातेदाराच्या खात्यात वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शेतजमीन खरेदीच्या व्यवहारासाठी चोरट्यांनी हे पैसे वर्ग केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सायबर पोलिसांनी त्यादृष्टीने तपासास सुरुवात केली आहे.
गंगापूर रोडवरील (Gangapur Road) पंपिग स्टेशन परिसरातील रहिवासी कंत्राटदाराकडे दुचाकीवरून दोन तरुण आले. कुरीअर पार्सल देण्यासाठी ओटीपी तपासण्याच्या बहाण्याने दोघांनी कंत्राटदाराचा आयफोन हिसकावून नेला. त्यानंतर काही वेळाने दोघांनी आयफोनमधून ऑनलाइन बँकींग व्यवहार करीत ३ कोटी ५० लाख रुपये इतर बँक खात्यांत वर्ग केले. ही बाब लक्षात येताच कंत्राटदाराने सायबर पोलिसांकडे (Cyber Police) तक्रार केली होती. तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत बँकेसोबत संपर्क साधून आर्थिक व्यवहारांचा तपशील मागवला.
तसेच कंत्राटदाराच्या बँक खात्यातून (Bank Account) ज्या-ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले ती सर्व खाती गोठवण्यात आली. त्यापैकी एक बँक खाते धुळे जिल्ह्यातील देवपूर येथील असल्याने पोलिसांनी बँक खातेधारकाकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने दिलेल्या माहितीनुसार, एका ब्रोकरमार्फत दोन व्यक्तींनी शेतजमीन खरेदीसाठी बोलणी केली होती. तसेच व्यवहार ठरल्याचे सांगत काही दिवसांपूर्वी फोन करून व्यवहाराचे एक कोटी रुपये ऑनलाइन टाकले आहेत, असे सांगितले.
मात्र, याबाबत माहिती नसल्याचे खातेधारकाने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी संशयितांच्या शोधार्थ आयफोन हिसकावणाऱ्यांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. कंत्राटदाराने वेळीच सायबर पोलिसांकडे (Police) तक्रार केल्याने पोलिसांनी बँकेशी संपर्क साधून कंत्राटदाराच्या बँकेतून झालेले सर्व आर्थिक व्यवहार रोखले. वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या सूचनेने सायबर पथकाने ही कामगिरी केली. ज्या बँक खात्यांत पैसे जमा झाले ती खातीही गोठवली. त्यानंतर दोन दिवसांत ते पैसे पुन्हा कंत्राटदारास सोपवण्यात आले आहेत.
ब्रोकरची चौकशी
धुळे येथील खातेधारकाच्या माहितीनुसार, नाशिकच्या ब्रोकरने जागा खरेदी करणाऱ्यांना आणल्याचे समजले. त्यामुळे सायबर पोलिसांनी संबंधित ब्रोकरकडेही तपास केला. मात्र त्याला देखील संबंधित खरेदीदारांबद्दल ठोस माहिती नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे आयफोन हिसकावणारे, ऑनलाइन व्यवहार करणारे व जागा खरेदीच्या निमित्ताने संपर्क साधणारे एकाच टोळीतील असल्याचा संशय आहे.