Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik Crime : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरी चोरीचा डाव फसला; चोरट्यांनी हाती...

Nashik Crime : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरी चोरीचा डाव फसला; चोरट्यांनी हाती काही न लागल्याने थेट कपडेच पिशवीत भरले

कुठे घडली घटना?

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

दरोडा (Robbery) टाकण्यासाठी आलेल्या चार दरोडेखोरांना हाती पैसे व सोन्याचे दागिने असे काहीच न लागल्याने चोरट्यांनी शेवटी घरातील कपडे आणि सीसीटीव्ही यंत्र चोरून नेल्याची घटना आज (गुरुवारी) सकाळी जेलरोड परिसरात घडली आहे. जेलरोडमधील पवारवाडीत भारत भूषण हाउसिंग सोसायटी जुना सायखेडा रोड जेलरोड (Jail Road) येथील एका बंगल्यात चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्ध इसम जखमी झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी रामदास गोविंद पगारे (वय ७६) हे त्यांच्या लहान सून निलम पगारे हिच्यासह शांती बंगला या निवासस्थानी राहतात. आज (गुरुवारी) सकाळी सुमारे ९.३० वाजता चार अज्ञात इसम निळ्या रंगाचे रेनकोट, डोक्यावर हेल्मेट आणि हातात हॅन्डग्लोज घालून त्यांच्या घराच्या (Home) बंगल्याच्या कंपाउंड मध्ये शिरले. त्यानंतर त्यांनी दरवाजा ठोठावला असता पगारे यांना सांगितले की, तुमच्या एसीची तक्रार आली आहे. पंरतु, आम्ही तशी कुठलीही तक्रार केलेली नाही असे पगारे यांनी सांगितले. मात्र, यानंतर या चोरट्यांनी दमदाटी करून जबरदस्तीने घरात प्रवेश केला.

YouTube video player

यावेळी पगारे यांनी विरोध केला असता, एका चोरट्याने त्यांच्या मानेजवळ चाकू लावत जखमी (Injured) केले. तर दुसऱ्याने पिस्तुलचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांचे हातपाय व तोंड चिकटपट्टीने बांधले. तसेच दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सुनेलाही खोलीत कोंडून तिचे हात व तोंड बांधले. घरात काही मौल्यवान वस्तू तसेच सोन्या-चांदीचे दागिने किंवा रोख रक्कम मिळती की काय म्हणून चोरट्यांनी शोधाशोध सुरु केली. यानंतर पगारे यांना पैसे व दागिने कुठे आहेत असे विचारले असता त्यांनी आमच्याकडे काहीच नाही असे सांगितले.

यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटे फोडली, मात्र त्यांना पैसे किंवा दागिने (Money and Jewelry) काहीच मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी चार पिशव्यांत कपडे, साड्या, मुलांचे कपडे व इतर सामान भरून घेतले. तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचा एनव्हीआर युनिटही सोबत घेऊन सर्व चोरटे फरार झाले. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच पगारे यांनी स्वतःची सुटका करून घेतली व त्यानंतर सुनेचे हात सोडवत तिला मुक्त केले. यानंतर त्यांनी डायल ११२ वर फोन करून पोलिसांना घरात चोरटे आल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. मात्र, आरोपींनी सीसीटीव्ही यंत्रणाच चोरून नेल्याने त्यांचे चेहरे वा हालचाली टिपता आल्या नाहीत.

दरम्यान, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) रामदास पगारे यांनी चार अज्ञात इसमांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तर घटनास्थळी पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी तातडीने भेट दिली व घटनेची माहिती घेतली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बिडकर हे या गुन्ह्याचा तपास करत असून, चोरट्यांच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. यावेळी चोरट्यांचा लवकरच शोध लागेल असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...