नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दुकानाच्या खिडक्या फोडून आत प्रवेश केल्यावर रक्कमेवर डल्ला मारण्यासह चोरट्यांनी (Thieves) सुकामेवा, नक्षीदार पैठणींसह सोन्याच्या नथदेखील लंपास केल्याचा अजब प्रकार शरणपूर रस्त्यावर (Sharanpur Road) घडला. महिन्याभरापूर्वी येवला तालुक्यात लाखो रुपयांच्या पैठणी चोरल्यानंतर आता नाशिक शहरातही झालेल्या या चोरीमुळे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा नोंद असून, चोरट्यांच्या मागावर पथके रवाना झाली आहेत.
शरणपूर रस्त्यावरील कुलकर्णी गार्डन परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका पैठणीच्या (Paithani) दालनासह सुकामेवा विक्रीच्या दुकानात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला. याप्रकरणी अमोल राजराम शिंदे (रा. पारिजातनगर) यांनी पोलिसांत (Police) फिर्याद दिली आहे. त्यांचे पैठणीचे दुकान असून, त्यांच्या शेजारी असलेल्या मुकेश तुलसानी यांच्या सुकामेवा विक्री दुकानातही चोरी झाली.
दरम्यान, २६ ते २७ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला असून चोरट्याने शरणपूर रोडवरील कलासाई पैठणी व शेजारील मुकेश तुलसानी यांचे क्रेव कॉर्नर ड्रायफ्रूटच्या दुकानाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खिडक्यांचे ग्रिल तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर, एकूण २ लाख सहा हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. तपास हवालदार बागूल करत आहेत. परिसरासह दुकानांतील (Shop) सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
नेमके काय चोरले?
४८,५०० रुपये रोख रक्कम
१० हजारांचा मोबाइल
१ लाख ९ हजारांच्या ९ पैठणी
१६ हजार ८०० रुपयांच्या सोन्याच्या नथ
१७ हजार ३०० रुपये रोख रक्कम
५ हजारांचा सुकामेवा
२ लाख ६ हजार ६०० रुपयांचा एकूण मुद्देमाल