नाशिक | Nashik
शहर पोलिसांनी (City Police) महिला सुरक्षेला ‘प्रथम प्राधान्य असल्याची भूमिका मांडली असताना रस्त्यांवर सतत होणान्या चेनस्नॅचिंगमुळे महिला भयभीत आहेत. अशातच आता चेनस्नॅचिंगचा ‘नवा पॅटर्न काही चोरट्यांनी नाशकात सुरु केल्याच्या चार धक्कादायक घटना एकाच दिवशी रात्री घडल्या आहेत. घरी जाण्यासाठी सोसायटीच्या ‘लिफ्ट पेसेज’ मध्ये थांबलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या चार महिलांवर हल्ला करुन ‘बर्गमेन’ वरील चोरट्याने एकूण अडीच लाखांचे दागिने ओरबाडून नेले आहेत. या घटनांनी महिलावर्गात भीती पसरली असून सराईत चोर अद्यापही पसार आहे.
सुशीला रामदास खाडे (वय ६२, रा. शुभअपार्टमेंट, झुडिओसमोर, अशोका मार्ग) यांच्या फिर्यादीनुसार, १४ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजता परिसरातून पायी आल्या व सोसायटीतील ‘लिफ्ट पेसेज’ मध्ये लिफ्टची वाट पाहत होत्या. त्याचवेळी महागड्या ‘बर्गमेन’ मोपेडवरुन एक संशयित आला. त्याने मोपेडचा नंबर दिसू नये म्हणूण ‘पार्किंग इंडिकेटर’ सुरु ठेवले, यानंतर खाडे यांच्या मागोमाग जात अचानक काही तरी विचारण्याचा बहाणा करुन त्यांच्या गळ्यातील ६४ हजारांचे मंगळसूत्र ओरबाडून पळ काढला. या घटनेत खाडे या प्रचंड भेदरल्या. त्यांनी आरडाओरड केली. मात्र, त्याक्षणी मदतीसाठी कुणीच नसल्याने चोरट्याने त्यांच्याशी झटापट करुन खाली पाडले व दागिने ओरबाडून मोपेडवरुन पळ काढला. या घटनेत खाडे यांच्या गळ्याला आणि कानाला दुखापत झाली असून उपचार सुरु आहेत.
दरम्यान, असाच धक्कादायक प्रकार खाडे यांच्या घराशेजारील लेन नंबर एकमधील कल्पतरु नगरात राहणाऱ्या प्रिशा उदय वासवाणी यांच्यासोबतही या घटनेपूर्वी घडला. त्या सोसायटीत असताना, चोरट्याने पाठलाग करुन जबरीने त्यांच्या गळ्यातील अंदाजे ५६ हजारांचे ‘लॉकेट’ ओरबाडून नेले. तसेच, तिसरा प्रकार, सायंकाळी सहा वाजेनंतर इंदिरानगर पोलिसांच्या हद्दीत घडला. शुभांगी संतोष कासार (वय ४२) व राजश्री प्रशांत कुलकर्णी (रा. अथर्व रेसिडेन्सी, प्रशांतनगर, पाथर्डाफाटा) या दोघी परिसरासह सोसायटीत असताना ‘बर्गमेन’ मोपेडवरील संशयिताने कासार यांच्या गळ्यातील ३८ हजार व कुलकर्णी यांच्या गळ्यातील ३० हजारांचे मंगळसूत्र व लकिट अशाच पद्धतीने ओरबाडले. चारही घटनांचा तपास मुंबईनाका व इंदिरानगर पोलीस करीत असून या सर्वच घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच कैद झाल्या आहेत.
पाच प्रकरणांची नोंद, एकच उघड
शहरात रस्त्यावरील चेनस्नॅचिंगच्या घटना कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक धाडसी पद्धतीने होत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, नागरिकांची सतर्कता आणि काही ठिकाणी पोलीस गस्त यामुळे रस्त्यावरील थेट चेनस्नॅचिंग तुलनेने धोकादायक ठरत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी आता नवा पॅटर्न निवडल्याचे दिसते. गेट नसलेल्या किंवा सुरक्षारक्षकांची कमतरता असलेल्या सोसायट्यांची रेकी करून चोरटे आत प्रवेश करतात. काही ठिकाणी तर चोरटे लिफ्टपर्यंत महिलांसोबत जात असल्याचे सीसीटीव्हीतून समोर आले असून केवळ पंचवटीतील रामवाडीत घडलेला अशा स्वरुपाचा एक गुन्हा पोलिसांनी उघड केला आहे.
ठळक मुद्दे
- घटनांचा परिणाम महिलांच्या सुरक्षिततेवर
- ज्येष्ठ नागरिकांसह एकट्या राहणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षितता
- पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर चौफेर टीका
- बर्गमेन मोपेड वापरणाऱ्यांकडे तपास
- सीसीटीव्हीतून साखळी जोडणार, तांत्रिक विश्लेषण
- रस्त्यावरील लूट आता घरात शिरल्याची तीव्र प्रतिक्रिया




