नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
आर्मी नर्सिंग परीक्षेला (Army Nursing Exam) आलेल्या उमेदवाराला (Candidate) लुटणाऱ्या तिघा चोरट्यांचा नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत छडा लावला. या चोरट्यांकडून गुगल पिक्सेल मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा ॲक्टिव्हा मोटारसायकल, मुद्देमाल असा सुमारे एक लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संशयित तिघे आरोपी अल्पवयीन मुले आहेत. भगवान रवींद्र पाटील (रा. वडाळी, ता. चाळीसगाव, जळगाव) व त्याचा मित्र आर्मी नर्सिंग परीक्षेसाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकात (Nashik Road Railway Station) उतरून सुभाष रोडमार्गे पायी जात असताना स्कूटरवर आलेल्या तिघांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. पाटील याच्या हातातील गुगल पिक्सेल मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला तसेच खिशातील रोख रक्कम चोरली आणि त्याला मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) संबंधितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी करत होते. स्कूटरवरील अनोळखी चोरटे कोण आहेत याचा ठावठिकाणा नसताना पोलीस (Police) अंमलदार अजय देशमुख व समाधान वाजे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. त्याचदरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरटे साठेनगर परिसरात दिसून येत आहेत. या माहितीनुसार पो.हवा विजय टेमगर, नाना पानसरे, विशाल कुंवर, नितीन भामरे यांनी साठेनगर परिसरात शिताफीने सापळा रचून मोटारसायकलवरून फिरणाऱ्या संशयित तिघांना ताब्यात घेतले.
दरम्यान, तपासाअंती तिघेही विधीसंघर्षित बालके असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची (Crime) कबुली दिली. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, Dial 112 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पो.नि. बडेसाब नाईकवाडे, स.पो.नि. प्रवीण सूर्यवंशी, पो.उ.नि. संदीप पवार, तसेच गुन्हे शोध पथकातील अविनाश देवरे, विजय टेमगर, विशाल कुंवर, समाधान वाजे, प्रशांत नागरे, अजय देशमुख, नितीन भामरे, नाना पानसरे, संतोष पिंगळ यांनी कारवाई केली.




