सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
येथील दोस्ती ट्रेडर्सचे संचालक सागर नामदेव लोंढे यांच्या दुकानात (Shop) जाऊन त्यांच्यावर जिवघेणा हल्ला (Attack) करणाऱ्या तिघांना सिन्नर पोलिसांनी (Sinnar Police) गुरुवारी (दि.१९) सायंकाळी ७ च्या दरम्यान शिंदे टोल नाक्याजवळील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले, त्यामुळे या गुन्ह्यातील पकडलेल्या आरोपींची संख्या ५ झाली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश पालवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हल्ल्यानंतर चौघे कार घेऊन संगमनेर रस्त्याने पळून जात होते. तेथे कार दुभाजकाला धडकल्यानंतर कार तेथेच सोडून चौघे पळाले होते. त्यातील दोघांनी परिसरातील एकाची मोटारसायकल घेऊन पळ काढला. तर दोघे मक्याच्या शेतात जाऊन लपले होते. या शेतातून तुषार रविंद्र उर्फ रामदास जाधव रा. मोरवाडी, नाशिक याला पोलिसांनी (Police) घटनेनंतरच्या अवघ्या दोन तासात पकडले होते. या चौघांव्यतिरिक्त परिसराची रेकी करण्यासाठी मोटारसायकलवर फिरणारा शाहरुख शब्बीर मनियार रा. गोकूळधाम सोसायटी, सिडको याला पोलिसांनी पकडले होते. त्याने या गुन्ह्यात बापरलेली मोटारसायकल सापडलेली नाही.
तर गुन्ह्यातील फरार असलेले तिघे आरोपी शिंदे टोल नाक्याजवळील चासुरी हॉटेलमध्ये आले असल्याची गुप्त बातमी मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक हॉटेलवर गेले. तेथे अजय मधुकर भोंगाळ (२४) रा. मोरवाडी गाव, सिडको नाशिक, आकाश मिलिंद बोन्हाडे (२४) रा. गजानन नगर, पाथर्डी फाटा, नाशिक व निलेश सुनिल अहिरे (२६) रा. मोखाडी गाव, सिडको या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या पाचही आरोपींना न्यायालयात (Court) दाखल केले असता न्यायालयाने त्यांना २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पकडलेल्या ५ पैकी चौघे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे.
तसेच तुषारवर अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) दोन गुन्हे दाखल आहेत. अजयवर अंबड पोलीस ठाण्यातच मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे. तर आकाशवर सन २०२० मध्ये अंबडलाच खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर निलेशवर अंबड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी एवढं टोकाचं पाऊल का उचलल? त्यामागे नेमके कारण काय आहे? याचा तपास पोलीस करीत आहेत. सागर लोंढे याची तब्येत सुधारत असून त्याच्याशी बोलल्यानंतरच या घटनेवर तपास पडू शकेल असे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले.
गुन्ह्यातील कार सागर नागरेची
गुन्ह्यातील कार नांदूरशिंगोटे येथे पोलिसांना सापडली होती. मात्र, या कारवी नंबर प्लेट बनावट असल्याने कारच्या चेसी नंबरवरून पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर ही कार सागर पोपटराव नागरे याच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे. सागरने ही कार त्यांना का दिली? तो या गुन्ह्यातील मास्टर माईंड असल्याचे म्हटले जाते. आमदार कोकाटे यांच्या विजयी मिखणूकीत सहभागी झालेल्या सागर नागरेची सागर लोंढे यांच्याबरोबर धक्काबुक्की झाल्यानंतर नागरे याला इतरांनीही बेदम मारहाण केली होती अशी चर्चा आहे. त्याचा बदला घेण्यासाठी तर हा प्रकार घडला नाही ना याचाही शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी नागरे याच्या घरी जाऊन त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यासाठी तो खासगी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली, पोलिसांनी संबंधित हॉस्पीटलमध्ये जावून चौकशी केली असता त्याला तेथून सुट्टी देण्यात आल्याचे आढळून आले. नागरे घरी न जाता फरार झाला असून त्याला पकडल्यानंतरच या घटनेमागील खरे कारण उघडकीस येऊ शकेल.