नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात तीन घटनांत (Three Cases) समाजकंटकांनी वाहनांची जाळपोळ करून सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शहरात तीन गुन्हे दाखल झाले असून एका गुन्ह्यात एका अल्पवयीन संशयितास (Suspected) ताब्यात घेतले असून त्याच्या जोडीदारास अटक (Arrested) केली आहे.
पहिल्या घटनेत अज्ञात संशयिताने शुक्रवारी (दि.३१) मध्यरात्री दीड वाजता बजरंगवाडी परिसरातील (एमएच १५ एचजी ५७७८) क्रमांकाच्या वाहनास आग (Fire) लावली. ॲड. पवन सोमनाथ भगत (२६, रा. बजरंगवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीने कारचे नुकसान करण्याच्या उद्देशाने पेट्रोल टाकून कारला आग लावली. यात कारचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत राजू शर्मा (रा. पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि.१) मध्यरात्री तीन वाजता अश्वमेधनगर परिसरात अज्ञात व्यक्तींनी कारसह दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. त्यामुळे या आगीत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. म्हसरुळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल असून पोलिसांनी तपास करीत एकास अटक केली असून त्याच्या अल्पवयीन जोडीदारास ताब्यात घेतले आहे.
तर तिसऱ्या घटनेत अज्ञात व्यक्तींनी पंचवटी कारंजा येथील लक्ष्मीनारायण सोसायटीत रिक्षास आग लावली. सचीन परशुराम खिल्लारे (३४) यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीने शनिवारी (दि.१) मध्यरात्रीच्या सुमारास एमएच १५ जेए १०३३ क्रमांकाच्या रिक्षास आग लावली. यामुळे रिक्षाचे नुकसान झाले आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सीसीटीव्हीमुळे ओळख
म्हसरुळ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची (CCTV) तपासणी केली असता त्यात वाहनांवर ज्वलनशील पदार्थ टाकून वाहनांना आग लावताना दिसला. त्यानुसार तपास करीत संशयित चेतन उर्फ लाल्या संजय लहामगे (२१, रा. अश्वमेध नगर) यास पकडले आहे. त्यास न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि.५) पोलीस कोठडी सुनावली आहे. लहामगेसोबत एक अल्पवयीन संशयितही ताब्यात आहे.
पोलासींकडून समजूत
म्हसरुळ येथील जाळपोळीच्या घटनेनंतर एका तृतीय पंथियाने म्हसरुळ पोलीस ठाण्यात जात नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शनिवारी (दि.१) गोंधळ घातला. शिवीगाळ करीत तृतीयपंथियाने विवस्त्र होत नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी संबंधिताची समजूत काढून न्यायालयामार्फत पुढील प्रक्रिया होईल असे सांगितले. संबंधितांनी संशयितांविरोधात संताप व्यक्त केला.