नाशिक | प्रतिनिधी | Nashik
चोरी, दरोडा, अमली पदार्थ, जबरी चोऱ्यांमधील गुन्हेगारांना दणका देण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मालेगाव व इगतपुरीतील तीन अट्टल गुन्हेगारांना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) स्थानबद्ध केले आहे.
मालेगाव व इगतपुरी येथील सराईत गुन्हेगारांबर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई (Action) करुनही त्यांचे गैरकृत्य सुरू असल्याची बाच ग्रामीण पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानुसार संबंधितांवर ठोस कारवाईचे आदेश अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिले. अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अनिकेत भारती, सहायक अधीक्षक तेगबीर संधु यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या.
त्यानुसार पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, पवारवाडीचे निरीक्षक सुधीर पाटील, इगतपुरीचे निरीक्षक राहुल तसरे, रमजानपुराचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांनी संशयितांविरुद्ध सबळ पुरावे संकलित केले. त्यानुसार तीन सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.
हे आहेत सराईत
१) मोहम्मद बेलाल मोहम्मद आजम उर्फ बिलाल (वय २२, रा. जाफरनगर, मालेगाव) याच्याविरुद्ध बारा गुन्हे नोंद. त्यामध्ये दरोडा तयारी, जबरी चोरी, दंगा, आर्म अॅक्ट, अमली पदार्थ (एनडीपीएस), बाल लैगिंक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हे.
२) नदीम खान मुबारक खान उर्फ नद्या (वय २८, रा. आयशानगर, मालेगाव) याच्याविरुद्ध सहा गुन्हे नोंद. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत, आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हे.
३) सचिन सुभाष म्हसणे (वय २४, रा. फांगुळगव्हाण, इगतपुरी) याच्याविरुद्ध सोळा गुन्हे नोंद. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दरोडा तयारी, आर्म क्ट, चोरीचे गुन्हे
यांच्यावरही टांगती तलवार
नाशिक ग्रामीण, मालेगाव हद्दीतील सराईत गुन्हेगार, झोपडपट्टी दादा, हातभट्टी गुन्ह्यातले संशयित, संघटीत गुन्हेगार, अमली पदार्थ गुन्ह्यातील संशयित, धोकादायक व्यक्ती, वस्तूंचा काळाबाजार करणारे, वाळू तस्कर, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे (व्हीडिओ पायरसी) यांच्याविरुद्धही कारवाईचे संकेत ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिले आहेत.
स्थानबद्धता व मोक्कांतर्गत कारवाईत वाढ करीत आहोत. गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद असलेल्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश पथकांना दिले आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीचे उद्घाटन करण्यासाठी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
विक्रम देशमाने, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण