नाशिक | भारत पगारे | Nashik
नाशिक शहरात (Nashik City) बकासूर, रावण, मॅडी, पॅडी व अशीच काहीतरी विशेषणे जोडून सोशल मिडियावर ‘रीलगिरी’ करणाऱ्या अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारी (Crime) प्रवृत्ती जोपासण्याचे प्रयत्न सफल केले आहेत. कारण, जानेवारी ते ४ एप्रिल २०२५ या ९५ दिवसांत खुनाच्या २० घटना घटना घडल्या आहेत. त्यामध्ये २६ विधिसंघर्षित बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यात कौटुंबिक कलहातून झालेले खून (Murder) वगळता सराईत गुन्हेगार व अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी विधिसंघर्षितांच्या मदतीने केलेल्या खुनांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे कबुतरबाजी व हद्दीच्या वादासह बदला घेण्यासाठी काही विधिसंघर्षितांनी मित्रांची हत्या केल्याचे समोर आले आहे. शहरात मालाविरुद्धची गुन्हेगारी कमी नसतानाच शरीराविरुद्धची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत चालल्याचे चित्र गेल्या ९ महिन्यांत वाढले आहे.
अल्पवयीन मुले गुन्हेगारीचे उदात्तीकरण करीत आहेत. शहरातील विविध पानटपऱ्या व वाइनशॉपबाहेर ही मुले सिगारेटचे झुरके मारण्यासोबतच लालेलाल ‘फुलचंद’ चावताना दिसत आहेत. त्यातील अनेक जण मद्याच्या आहारी गेले आहेत. स्थानिक राजकारणी, नेते, पदाधिकारी, काही संस्था व संघटनांच्या व्हाईट कॉलर संशयितांनी (Suspected) या अल्पवयीनांना क्षुल्लक अर्थ व मद्यपुरवठा केल्याने ते सताड आणि नको त्या ठिकाणी बिनधास्त मुजोरी करताना दिसत आहेत.
दरम्यान, या मुलांना अंकुश कसा लावायचा, यादृष्टीने शासन काहीसे प्रयत्न करीत असताना १३ ते साडेसतरा वयोगटातील विधिसंघर्षित मुले आपले गुन्हेगारी इप्सित साध्य करीत आहेत. वयामुळे कायद्याचे संरक्षण व गुन्हा केल्यानंतर मिळणारी सहानुभुती या कारणास्तव गुन्हेगारीशिवाय (Crime) या मुलांना काही दिसेनासे झाल्याची स्थिती नाशिकमध्ये आहे.
विधिसंघर्षितांचे काही गुन्हे
‘एकमेकांच्या परिसरात यायचे नाही व भाईगिरी दाखवायची नाही’ या वादातून उद्भवलेल्या अल्पवयीनांच्या दोन टोळ्यांनी महिनाभरात दोघांचे खून केले. विधिसंघर्षित अरुण राम बंडी याचा अल्पवयीनांसह टोळक्याने ८ मार्चला संत कबीरनगरात निघृण खून केला. याच खुनाचा बदला घेण्यासाठी काही विधिसंघर्षितांनी बंडीच्या खुनात सहभागी करण चौरे या विधिसंघर्षिताचा २८ एप्रिलला कामटवाडे गावात भरदिवसा एकटे गाठून खून केला होता.
कबूतरबाजीतून खून
इंदिरानगरात १४ एप्रिलच्या रात्री अल्पवयीनांनी सुरु केलेल्या कबूतरबाजीच्या वादातू राम उर्फ रामदास नारायण बोराडे या वीस वर्षीय तरुणाचा पाच मुख्य संशयितांसह तिघा विधिसंघर्षित बालकांनी खून केला होता. तर एकावर प्राणघातक हल्ला केला होता.
ठळक मुद्दे
प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांत वाढ.
खुन्नस, भाईगिरी, नशा व पैशांच्या वादातून खून.
पिस्तुलाचा धाक दाखवून लुटीसारख्या गुन्ह्यात सहभाग.
एकलकोंडेपणामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ.