नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पार्टटाइम जॉब (Part Time Jobs) देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील दोघांना १८ लाख ८३ हजार ९१० रुपयांचा गंडा घातला आहे. ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान, भामट्यांनी हा गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीसह (Fraud) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांकडे दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोघांशी भामट्यांनी संपर्क साधला. पार्ट टाइम जॉब देण्याचे आमीष दाखवून दोघांनाही टेलिग्राम या सोशल मीडियावरील क्रुड ग्रुप १ व जसविंदर या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर सुरुवातीस वेगवेगळे टास्क देत पैसे खात्यात जमा झाल्याचे सांगितले. नवीन टास्क पाहिजे असल्यास भामट्यांनी दोघांकडे पैशांची (Money) मागणी केली. त्यानुसार दोघांनी पैसे जमा केले. मात्र दोघांनी जेव्हा पैशांची मागणी केली त्यावेळी भामट्यांनी पैसे दिले नाहीत.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनीही सायबर पोलिसांकडे (Cyber Police) तक्रार केली. त्यानुसार दोघांशी संपर्क साधणाऱ्यांसह ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. त्या बँक खातेधारकांविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे तपास करीत आहेत.