नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रिक्षेस (Rickshaw) धक्का लागल्याची कुरापत काढून दोघा मग्रुर रिक्षाचालकांनी एका कारचालकास धक्काबुक्की करून शालिमार चौकात (Shalimar Chowk) येथेच्छ राडा घातला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी दोन वाजता घडली. दरम्यान, या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी सोशल मीडियावर चटकन व्हायरल झाला. त्यानुसार या घटनेची दखल घेत भद्रकाली पोलिसांनी (Bhadrakali Police) स्वतःहून सरकार पक्षाच्या वतीने फिर्याद दाखल करून मुख्य संशयित रिक्षाचालक मजहर अन्वर खान (रा. कथडा, जुने नाशिक) व अरबाज रफिक शेख (रा. वडाळागाव) यांना अटक केली. संशयिताची रिक्षाही जमा करण्यात आली आहे.
भद्रकाली पोलीस ठाण्याचे अंमलदार विक्रांत मगर यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. १४) दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान देवळाली कॅम्प येथील एक स्विफ्ट कारचालक (डीएल १२ सीएन २८२३) हा कालिदास कलामंदिराकडून शालिमार चौकाच्या दिशेने जात होता. त्याचवेळी शालिमार चौकातील शिवसेना कार्यालयाच्या बाहेर असलेल्या काहीशा गर्दीत या कारचा किरकोळ धक्का मजहरच्या रिक्षेस लागला. त्यामुळे त्याने रिक्षातून बाहेर येत कुरापत काढून कारचालकास (Driver) शिवीगाळ केली. यानंतर आजूबाजूचे काही संशयित (Suspected) रिक्षाचालक एकत्र जमले. त्यातील मजहरच्या साथीदारासह इतरांनी कल्लोळ माजवला. मजहरच्या शिवीगाळ आणि दमदाटीने कारचालक तरुण पुरता घाबरला. तो आणि कारमधील महिला जीवाच्या आकांताने माफी मागून विनवणी करत होते.
दरम्यान, त्याबाबत कोणताही माणुसकी भाव न दाखवता मजहरने कारमधील सर्वांना शिवीगाळ करून कारची काच फोडली. दरम्यान, या संपूर्ण लाईव्ह घटनेचा व्हिडिओ काहींनी चित्रित केला. तो शनिवारी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झळकताच शेकडो नेटकऱ्यांनी टवाळखोर रिक्षाचालकाच्या कृतीवर संताप व्यक्त करून त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत तत्काळ सहाय्यक निरीक्षक वसंत पवार व पथकास कारवाईचे (Action) आदेश दिले. यानंतर पवार यांच्या पथकाने मग्रुर रिक्षाचालक अन्वर व साथीदारास रिक्षेसह (एमएच १५ जेए ३५०४) ताब्यात घेत अटक केली. सखोल चौकशी केली जात आहे.
मुजोर रिक्षाचालकांना आवरा
कारमधील चालक व त्याच्यासोबतची महिला धक्कादायक प्रसंगावेळी विनवणी करत असतानाही या रिक्षाचालकांनी हुज्जत घालून कारची काच फोडली. गर्दी जमा झाल्याने अखेर संशयितांनी काढता पाय घेतला. जर गर्दी झाली नसती किंवा काही सुजाण नागरिकांनी मध्यस्थी केली नसती तर शालिमार चौकात विपरीत घटना घडली असती किंवा कारमधील चालकावर प्राणघातक हल्ला करण्याइतपत संशयितांची मजल झाली होती. दरम्यान, शहरात अनेक रिक्षाथांबे हे सराईत व गुन्हेगार रिक्षाचालकांचे आश्रयस्थान झाले असून त्यांच्यातील भाईगिरीचे अवगुण सर्वसामान्यांसाठी तापदायक ठरत आहेत. त्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मुद्दे
- सोशल मीडियावर निषेधाच्या पोस्ट, अनेक मागण्या
- नाशकातील सराईत रिक्षाचालकांचे परवाने रद्द करण्याची मागणी
- घटनेचा विविध संस्थांकडून निषेध
- अशा गुन्हेगारी रिक्षाचालकांना कोणाचे अभय, असे प्रश्न उपस्थित
- गुन्हेगार चालकांच्या रिक्षा जप्त कराव्यात
- सराईत चालकांमुळे प्रामाणिक रिक्षाचालकांना फटका