नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मागील काही दिवसांत नाशिक शहरातील (Nashik City) गंभीर घटना पाहता सराईतांनी नाशिकवर अधिराज्य गाजवत असल्याचे चित्र आहे. एका पाठोपाठ खून, हल्ले, मारहाणीच्या घटना नित्याच्याच झाल्या असून, महिला सुरक्षेचा प्रश्न देखील पुढे आला आहे. एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवत संशयिताने (Suspected) लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोन युवतींचा परिचितांनीच विनयभंग केल्याचे समोर आले आहे. यातील एक अल्पवयीन मुलगी आहे. याप्रकरणी इंदिरानगर, पंचवटी व उपनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे (Case) दाखल करण्यात आले आहेत.
इंदिरानगर पोलीस ठाणे (Indiranagar Police Station) हद्दीत राहणाऱ्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे मनीष लोखंडे (रा. श्रद्धागार्डन जवळ) या युवकाशी सन २०१५ पासून प्रेमसंबंध होते. या काळात त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेत अनेकवेळा बलात्कार केला. युवतीच्या कुटुंबियांनी लग्नाची तयारी सुरू केल्याने, तिने संशयिताकडे लग्नासाठी तगादा लावला असता, ही घटना घडली. संशयिताने जातीवाचक शिवीगाळ करून लग्नास नकार दिल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार व अॅट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख करीत आहेत. तसेच विनयभंगाचा पहिली घटना हिरावाडीत (Hirawadi) घडली. १६ वर्षीय पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. नाझीम ऊर्फ नासिर मुल्ला या शेजाऱ्याने तिचा विनयभंग करुन नाहक त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मार्च महिन्यात अल्पवयीन मुलगी संशयिताच्या घरात जेवण देण्यासाठी गेली असता, त्याने विनयभंग केला. याबाबत वाच्यता केल्यास वडील व बहिणीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने याबाबत वाच्यता केली नाही. मात्र, यानंतर संशयित तिच्यावर पाळत ठेवून मोबाइलवर बोलण्यास भाग पाडत असल्याने, तिने याबाबत पोलिसात (Police) धाव घेतली. पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग व बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.
दसकमध्येही विनयभंग
दसक परिसरात पीडिता व तिचा पती मंगळवारी (दि. २९) दुपारच्या सुमारास घरात असताना शेजारी राहणाऱ्या संशयित तेजस गांगुर्डे, मंथन मोरे, शैला मोरे, भूमी मोरे आदींनी त्यांच्या घरात बेकायदा प्रवेश केला. यावेळी संशयितांनी आईला का मारले याबाबत जाब विचारत दाम्पत्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत मंथन मोरे याने महिलेचा विनयभंग केला असून, याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.