नाशिक | प्रतिनिधी | Nashik
चेहऱ्यावर स्कार्फ, गर्दीत सफाईदार हालचाली आणि दोन मिनिटांत बदललेला वेश ठक्कर बझार बसस्थानकावरील गर्दीतून महिलेचे (Woman) लाखो रुपयांचे दागिने (Jewelry) चोरी करून ‘स्पेशल’ रिक्षातून पसार झालेली संशयित महिला स्वतःला सुरक्षित मानत होती. मात्र, तिची प्रत्येक पावले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाल्याने ती अखेर गुन्हेशाखेच्या जाळ्यात अडकली.
हे देखील वाचा : Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
सोन्याचे दागिने अत्यंत चतुराईने चोरणाऱ्या ३८ वर्षीय निर्मला विजय लोंढे (रा. तिरुपतीनगर, खर्जूल मळा, टाकळी रोड, नाशिक, मूळ रा. जाजूवाडी, मालेगाव कॅम्प, नाशिक) या संशयित महिलेस अंबड क्राईम सबयुनिटने अटक केली आहे. विशेष म्हणजे, या महिलेने कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे कारण पुढे करत चोरी केल्याचा दावा केला असला, तरी तिच्या जबाबातील विसंगतींमुळे पोलिसांनी (Police) सखोल तपास सुरू केला आहे. बसस्थानकावरील गर्दी, बसमध्ये बसताना, उतरताना होणारी धक्काबुक्की, महिलांचे लक्ष सामानाकडे नसणे आणि गर्दीत मिसळून जाण्याची संधी, याचा अभ्यास करून निर्मलाने ही चोरी केल्याचे तपासात उघड झाले.
सरकारवाडा पोलिसांत अमित अशोक वाघमारे (रा. शिवाजीनगर, दिंडोरी, जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ३० डिसेंबर २०२५ रोजी ठक्कर बाजार बस स्टॅण्ड येथे त्यांच्या पत्नीच्या पर्समधील साडेचार लाखांचे दागिने चोरी झाले होते. सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हेशाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. अंबड गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व पथकाने ठक्कर बझार बसस्थानक व परिसरातील १५ किलोमीटर परिघातील तब्बल २७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले. अनेक तासांच्या फूटेजमधून संशयास्पद हालचाल करणारी एक महिला पोलिसांच्या रडारवर आली.
हे देखील वाचा : Nashik Politics : महापालिका निवडणुकीत बिग फाईट; ‘या’ प्रभागांमध्ये वातावरण टाईट
दरम्यान, ती गर्दीतून प्रवाशांच्या जवळ जाताना दिसली. काढत चोरी केल्यानंतर तिने चेहऱ्यावरील ‘स्कार्फ ‘ थेट बसस्थानकातील प्रसाधनगृह गाठले. अवघ्या दोन मिनिटांत ती वेगळ्या रंगाचा स्कार्फ वा स्टोल लावून पुन्हा बाहेर आली. हा बदल पोलिसांनी हेरुन पुढील तपास केला. तेव्हा तिने त्र्यंबकरोडवरुन ‘स्पेशल’ रिक्षा ठरवून नाशिक रोडच्या दिशेने पलायन केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ रिक्षाचा क्रमांक शोधून चालकाला गाठले. चालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार तपास पुढे नेत संशयित महिला दसक भागात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून तिला ताब्यात घेतले.
यामुळे चोरी?
चौकशीदरम्यान महिलेने पती बेरोजगार असल्याचे सांगितले. चार मुलींपैकी दोन मुलींचे विवाह झाले असून, उर्वरित दोन मुलींच्या शिक्षणासाठी व घरखर्चासाठी चोरी केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र, तिच्या सांगण्याला पुरेसा आधार नसल्याने आणि हालचाली पाहता ही चोरी केवळ एकदाच करण्यात आलेली नसावी, असा पोलिसांचा संशय आहे. तिने केलेले अशाच स्वरुपाचे इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता असून निर्मलाच्या अंगझडतीत महिला अंमलदारांना एक मंगळसूत्र, टॉप्स, नेकलेस व कानवेल असा एकूण ४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल आढळला आहे. तिने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिचा ताबा सरकारवाडा पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.




