नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कामाच्या शोधात नांदेड येथून नाशकात (Nashik) आलेल्या तरुणाला ४५ वर्षीय महिलेने घरात भाडेतत्वावर आसरा दिल्यावर काही महिन्यांनी त्या तरुणाकडून (Youth) होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रास छळाला कंटाळून घरमालकीणीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना जुने नाशकातील अमरधाम रोड परिसरात घडली. पूजा मल्हार घेगडमल (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या मुलीच्या फिर्यादीवरुन संशयित शंकर रमेश खाडेकर (२५, रा. अर्धापूर, नांदेड) याच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसांत (Bhadrakali Police) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी खाडेकरला अटक (Arrested) केली आहे. मृत घेगडमल यांच्या अठरा वर्षीय विवाहित मुलीने यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. घेगडमल या त्यांच्या दोन मुलींसह अमरधाम परिसरातील शितळादेवी होत्या. पूजा या पहिल्या पतीपासून विभक्त असून, त्यांनी सिडकोतील एका व्यक्तिशी दुसरा विवाह केला होता. परंतु, अमरधाम परिसरातील खोलीची साफसफाई व पाणी भरण्यासाठी घेगडमल या सिडकोतून तेथे येत होत्या. घेगडमल यांच्या १८ वर्षीय मुलीचे पंधरा दिवसांपूर्वीच लग्न (Marriage) झाले होते.
दरम्यान, घेगडमल यांच्या खोलीत संशयित (Suspected) हा जानेवारी २०२४ पासून वास्तव्यास होता. संशयिताविरुद्ध परिसरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने घेगडमल यांनी काही महिन्यांपूर्वी त्याला घरातून बाहेर राहण्यास सांगितले, त्यानंतर संशयित हा घराबाहेर किंवा परिसरात कोठेही वास्तव्य करू लागला, परंतु, अधूनमधून घेगडमल यांच्या खोलीजवळ येत ‘मला पुन्हा इथे राहू द्या’, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण (Beating) करु लागला. या त्रासाला वैतागून घेगडमल यांनी आत्महत्या केली आहे.
एकतर्फी प्रेम
पूजा यांच्या आत्महत्येनंतर अंत्यसंस्कारावेळीही संशयित खाडेकर तेथे उपस्थित होता. घेगडमल यांच्या नातलगांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, निरीक्षक श्रीनिवास देशमुख, विवेक मोहिते, उपनिरीक्षक प्रताप दहिफळे, हवालदार मिलिंद सूर्यवंशी यांच्या पथकाने घटनास्थळी जात पंचनामा करुन तपासाअंती संशयिताला अटक केली. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानें संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खाडेकर सराईत गुन्हेगार
संशयित शंकर विरुद्ध नांदेड जिल्ह्यात घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तेथील गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी तो नाशिकमध्ये तळ ठोकून होता. नांदेड पोलीस अनेकदा त्याच्या मागावर नाशिकपर्यंत आले होते. परंतु, तो नदिड पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान, १४ मार्च रोजी शंकर आणि पूजा यांच्यात वाद झाल्यानंतर पूजा यांनी रात्री ‘डायल ११२’ या क्रमांकावरून पोलिसांची मदत मागितली होती. पोलीस पथकाने तेथे पोहोचून दोघांतील वाद मिटवून संशयिताला हुसकावून दिले होते. परंतु, त्रासलेल्या पूजा यांनी १५ मार्च रोजी गळफास घेतल्याचे आढळून आले. दरम्यान, पूजा यांच्यावर संशयिताचे एकतर्फी प्रेम होते व त्यातूनही तो त्यांना त्रास देत होता, असा पोलिसांना संशय आहे.