नगरसूल | वार्ताहर | Nagrsul
येथील कोळगाव रोडवरील माळवाडी येथे भर दुपारी मोटारसायकल वरून आलेल्या दोन भांमट्यांनी बोलण्याचा बहाणा करून महिलेची (Women) एक तोळा वजनाची गळ्यातील पोत घेऊन पळून गेल्याची घटना घडली. माळवाडी येथील रहिवासी शेतात कामासाठी गेले असतां दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मोटारसायकल वरून आलेल्या दोन भामट्यांनी रहिवाशी इंदूबाई बाळनाथ कमोदकर या महिला एकट्या घरी असताना त्यांना महिलांच्या गळ्यातील पोती व सोने चोरी होत असल्याची बतावणी केली.
तसेच आम्ही शिंदे पोलीस (Police) असून या परिसरात एक महिलेची गळ्यातील पोत चोरी झाली आहे. तो तपास करण्यासाठी आम्ही आलो आहोत. तरी तुमच्या गळ्यातील पोत सुरक्षितेसाठी काढून ठेवा.महिलेनेही गळ्यातील पोत काढली असता एक छोटी पिशवी पुढे करून यात ठेवा असे सांगितले. त्यानंतर पॅक करण्याचा बहाणा करून हातोहात पोत गहाळ करून वाळू भरलेली पिशवी महिलेच्या हातात देऊन नीट सांभाळा असे सांगून तेथून पोबारा केला.
दरम्यान, भामटे तेथून निघून जाताच इंदुबाई यांना संशय आल्याने त्यांनी पिशवी उघडून बघितली, तर त्यात वाळु भरलेली बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. यावेळी पोत चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी जागेवरच हंबरडा फोडला. त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या बाळनाथ कमोदकर यांनी मोलमजुरी करून साचवलेल्या पुंजीतून पत्नीच्या (Wife) गळ्यातील पोत बनवली होती. पोत चोरी झाल्याने त्यांचे या घटनेत दीड लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान हेल्मेट घातलेले भामटे शेख वस्तीकडून पाटाच्या रस्त्याने फरार झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.




